Dhule: चहाच्या टपरीजवळ उभ्या तरुणाकडून पिस्तूल, काडतूस हस्तगत, पारोळा चौफुलीजवळील घटना
By देवेंद्र पाठक | Published: February 19, 2024 02:07 PM2024-02-19T14:07:30+5:302024-02-19T14:07:55+5:30
Dhule News: पारोळा चौफुलीवर दुचाकीसह उभ्या असणाऱ्या तरुणाकडून दुचाकीसह दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असा १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
- देवेंद्र पाठक
धुळे - पारोळा चौफुलीवर दुचाकीसह उभ्या असणाऱ्या तरुणाकडून दुचाकीसह दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असा १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी सायंकाळी पावणे सहा वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या प्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. शंकर बाकिसन रेड्डी (वय २२) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
पारोळा चौफुली परिसरात असलेल्या हनुमान मंदिराजवळील एका चहाच्या टपरीजवळ एक तरुण दुचाकीसह उभा आहे. त्याच्याकडे पिस्तूल असून, ती विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. ही माहिती मिळताच तरुणाला पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. हनुमान मंदिराजवळ थांबलेल्या तरुणाकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची एक याप्रमाणे ८० हजार रुपये किंमतीची दोन पिस्तूल, २ हजार रुपयांची २ जिवंत काडतूस आणि (एमएच १८, सीबी ४४२९) क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शंकर बाकिसन रेड्डी (वय २२, रा. राष्ट्रवादी भवनजवळ, विद्युतनगर, मिल परिसर, धुळे) या तरुणाला अटक करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल एस. एस. सोनवणे करत आहेत.
त्याने ही पिस्तूल आणली कुठून व कोणाला विकणार होता, यासह अनुषंगिक माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे.