धुळे पोलिसांनी राबविले कोम्बिंग आॅपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:21 PM2018-05-12T13:21:22+5:302018-05-12T13:21:22+5:30
शहरात तीन ठिकाणी कारवाई : ६ तलवारींसह तीन जणांना घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात वाढणारी गुंडगिरी लक्षात घेता यावर पायबंद घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्यातील संवेदनशिल भागात गुरुवारी पहाटे कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ अचानक राबविलेल्या या मोहिमेत ६ तलवारी मिळाल्या असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले़
आमदार अनिल गोटे यांनी जुगार अड्ड्यावर केलेली कारवाई, पोलिसांचे होणारे दुर्लक्ष आणि शहरात वाढणारी गुंडगिरी लक्षात घेता धुळे पोलीस आता सतर्क झाले आहेत़ नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनीही शस्त्र शोध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते़ या अनुषंगाने गुरुवारी पहाटे आझादनगर, चाळीसगाव रोड आणि देवपूर पोलीस स्टेशन भागात कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यात आले़ कोम्बिंग आॅपरेशन दरम्यान, रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार, धुळे शहरातून हद्दपार करण्यात आलेले गुंड, गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेणे यासह अवैध शस्त्र बाळगणाºया इसमांच्या घरी जाऊन पोलिसांच्या पथकाने शोध घेतला होता़
पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, देवपूर पोलीस निरीक्षक दत्ता पवार आणि चाळीसगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी ही संयुक्तपणे मोहीम राबविली़
आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीत वाखारकर नगरातील नाटेश्वर कॉलनीत शुक्रवारी पहाटे दीड वाजता गणेश विक्रम सोनवणे (२३) हा लोखंडी तलवार घेऊन फिरताना आढळला़ त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली आहे़ त्याच्याविरोधात आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला़ घटनेचा तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निजाम सैयद करीत आहेत़ चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत हाफिज सिद्दीकी नगरात सरदार हॉलजवळ तौसिफ शेख अजिज शेख (२५) हा लोखंडी तलवार घेऊन संशयितरीत्या फिरताना आढळून आला़
त्याच्याजवळील तलवार जप्त करण्यात आली असून त्याला अटक केली आहे़ हेड कॉन्स्टेबल एस़ एऩ महाजन करीत आहेत़ तसेच देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मरीमाता भिलाटीत आकाश जालीम गायकवाड (२६) हा तरुण लोखंडी तलवार घेऊन फिरताना आढळून आला़ त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली़ पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अवैध धंदे, शस्त्र शोधणे याकामी सतर्क झाले आहेत. नियमित आढावा घेतला जात आहे.