Dhule: सप्तश्रृंगी देवी धुळे विभागाला पावली, नांदुरी गड यात्रेतून मिळाले सव्वा कोटींचे उत्पन्न
By अतुल जोशी | Published: April 7, 2023 06:04 PM2023-04-07T18:04:47+5:302023-04-07T18:05:00+5:30
Dhule News: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले.
- अतुल जोशी
धुळे - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागातील ९ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्यावर्षापेक्षा यावर्षी २५ लाख रूपयांचे उत्पन्न जादा मिळाल्याची माहिती धुळे विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली.
सप्तश्रृंगी गडावर चैत्र महिन्यात यात्रा भरत असते. या यात्रोत्सवादरम्यान खान्देशातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर जातात. यातील काही पायी तर काही महामंडळाच्या बसने गडावर जातात. गडावर जाणाºया भाविकांसाठी महामंडळातर्फे दरवर्षी जादा बसेस सोडण्यात येत असतात. यावर्षीही धुळे विभागातर्फे २९ मार्च ते ५ एप्रिल २०२३ अशा सात दिवसांसाठी नांदुरीगडासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार,शहादा, अक्कलकुवा, नवापूर या आगारांमधून जवळपास २०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. विभागातील बसेसनी १ हजार ५५३ फेऱ्या केल्या. यातून ७२ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून धुळे विभागाला १ कोटी २५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळालेले आहे.
२०२२ मध्ये धुळे विभागातून १२६६ फेऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यातून विभागाला १ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. गेल्यावर्षापेक्षा यावर्षी विभागाला २५ लाखांचे जास्त उत्पन्न मिळाले. यासाठी विभाग नियंत्रक विजय गिते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, सर्व वाहतूक पर्यवेक्षक, चालक, वाहक यांनी परिश्रम घेतल्याचे सांगण्यात आले.