Dhule: शॉर्टसर्किटने तीन झोपड्यांसह साहित्यही जळून खाक, शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी गावातील घटना
By देवेंद्र पाठक | Published: March 17, 2023 03:58 PM2023-03-17T15:58:29+5:302023-03-17T15:59:06+5:30
Dhule News: शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथे आदिवासी भागातील वसाहती असलेल्या तीन झोपड्या जळून खाक झाल्या. यात जीवितहानी झाली नसलीतरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले.
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथे आदिवासी भागातील वसाहती असलेल्या तीन झोपड्या जळून खाक झाल्या. यात जीवितहानी झाली नसलीतरी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. शिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथील आदिवासी वस्तीत राहणारे प्रताप भिका भिल, आप्पा बन्सी भिल, छोटू मंगा भिल या तीनही कुटुंबातील सदस्य बुधवारी कामासाठी शेतात गेलेले होते.
दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि लागून असलेल्या तीन झोपड्यांना आग लागली. आग लागल्याचे कळताच आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्यही सुरू केले. तलाठींसह शिंदखेडा पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यापाठोपाठ अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले हाेते. सर्वांच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीत घरातील सर्व साहित्य, कपडे, सायकल, कपाट, बाजरी, तांदूळ, गहू यासह किरणा मालही जळून खाक झाला. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान शासकीय कर्मचारी संपावर असल्यामुळे घटनेचा पंचनामा होऊ शकलेला नाही. याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांत ही घटनेची नोंद करण्यात आलेली नाही.