धुळ्यात पुत्र ठरला पित्याचा वैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:05 PM2020-08-23T22:05:09+5:302020-08-23T22:05:33+5:30

विटाभट्टी भागातील थरार : आईने दिली मुलाविरुध्द फिर्याद

In Dhule, the son became the enemy of the father | धुळ्यात पुत्र ठरला पित्याचा वैरी

धुळ्यात पुत्र ठरला पित्याचा वैरी

Next

धुळे : माझी आई कुठे गेली असे ओरडत आलेल्या मुलाला त्याच्या वडिलांनी केवळ हळू बोलण्याचा सल्ला दिला आणि हाच धागा पकडून निष्ठूर मुलाने आपल्या आजारी असलेल्या मुलावर स्क्रू ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना १४ आॅगस्ट रोजी घडली़ क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले़ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या वृध्दाला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले़ त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली़ त्यांच्या पत्नीने आक्रोश करीत खुद्द आपल्या मुलाविरुध्द शनिवारी फिर्याद दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला़ देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे़
देवपुरातील विटाभट्टी भागात दुर्गामाता मंदिर आहे़ या मंदिराजवळच धोंडीराम सोमाजी पगारे (६९) हे आपली पत्नी कौशल्या, मुलगा राहुल आणि मुलगी सोबत वास्तव्यास आहेत़ त्यांची मुलगी ही जवाहर मेडीकल फाऊंडेशन येथे नर्स म्हणून आपली सामाजिक सेवा बजावित असून त्या माध्यमातून आपल्या परिवाराला हातभार लावत आहे़ धोंडीराम पगारे हे वृध्द असल्याने ते आजारी होते़ त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते़ परिणामी ते घरीच झोपून होते़ त्यांची पत्नी कौशल्या ही त्याच भागात होती़
१४ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास धोंडीराम यांचा मुलगा राहुल हा बाहेरुन आला आणि माझी आई कुठे गेली असे वडिलांना मोठमोठ्या विचारु लागला़ वडील आजारी असल्यामुळे त्याचा मोठा आवाज त्यांना सहन होत नव्हता़ त्यामुळे त्यांनी मोठ्याने बोलू नको, हळू बोल असा प्रेमाचा सल्ला दिला़ तो सल्ला त्यांचा शेवटचाच ठरला अशी घटना घडली़ वडिलांनी दिलेला सल्ला राहुल पटला नाही़ त्यांनी तेच वाक्य पकडून संताप केला़ घरात पडलेले स्कू्र ड्रायव्हर शोधून काढत त्याच्या वडिलांवर हल्ला चढविला़ स्कू्र ड्रायव्हर पकडून राहुलने वडिलांच्या डाव्या कानावर चार ते पाच वार केले़ एवढ्यावरच तो थांबला नाही़ त्याने अधिक आक्रमक होत हाताबुक्यांनी तोंडावर, डोळ्यावर, दाढीवर जोरजोराने मारहाण केली़ यामुळे धोंडीराम हे रक्ताच्या थारोळ्यात निपचत पडले़
या घटनेमुळे झालेला आरडाओरड कौशल्या हिच्या कानावर आली आणि क्षणाचाही विलंब न करता तिने घराकडे धाव घेतली़ तातडीने त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, देवपूर पोलीस निरीक्षक संजय सानप आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले़ खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना धोंडीराम यांची प्राणज्योत मालवली़ अंत्यविधीचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर कौशल्या पगारे (५५) या महिलेने ममता पोटात ठेवून देवपूर पोलीस स्टेशन गाठले आणि आपल्या पोटच्या पोराविरुध्द रितसर फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, संशयित राहुल धोंडीराम पगारे याच्या विरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ राहुलला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे़
महिन्यातील तिसरी घटना
फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवल्याच्या कारणावरुन तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना चाळीसगाव रोडवरील मुल्ला कॉलनीत रविवार ९ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा घडली होती़ तर शिरपूर तालुक्यातील तिखीबर्डी येथे घरगुती वादातून पतीने विळ्याने घाव घालत पत्नीची हत्या केली. ही घटना १२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी घडली़ याप्रकरणी पतीला अटक केली आहे़ या दोन घटनांनंतर ही तिसरी घटना घडली आहे़

Web Title: In Dhule, the son became the enemy of the father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे