धुळे तालुक्यात सरपंचपदी कॉँग्रेसचे सात तर भाजपचे सहा उमेदवार विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:07 PM2018-09-27T13:07:40+5:302018-09-27T13:09:11+5:30
पिंपळनेरला कॉँग्रेसचे माजी सभापती पराभूत
आॅनलाईन लोकमत
धुळे : तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल गुरूवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जाहीर झाले. सात ग्रा.पं.वर कॉँग्रेसचे, सहा ग्रा.पं.वर भाजपचे तर एका ग्रा.पं.वर राष्टÑवादी कॉँगै्रसचे सरपंच निवडून आले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, साक्री तालुक्यातील पिंपळनेर ग्रा.पं.च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे माजी पं.स.सभापती व जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे कट्टर समर्थक संजय ठाकरे पराभूत झाले.
बुधवारी जिल्ह्यातील ७४ ग्रा.पं.साठी मतदान घेण्यात आले होते. गुरुवारी सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयात तालुक्यातील १४ ग्रा.पं.ची मतमोजणी करण्यात आली. अवघ्या दोन तासांत निकाल जाहीर करण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील निमगूळ, लामकानी, रानमळा, धाडरी, धाडरे, सौंदाणे व नंदाळे बु।।. या सात ग्रा.पं.वर कॉँग्रेसचे उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले. तर अनकवाडी, अंचाळे तांडा, नावरी, शिरढाणे प्र.डां., जापी व नाणे या सहा ग्रा.पं.वर भाजपचे उमेदवार सरपंच पदी निवडून आले आहेत. कुसुंबा या तालुक्यातील एकमेव ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्टÑवादी कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.
तालुक्यातील १६ ग्रा.पं.साठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र माघारीअंती नवलनगर व सातरणे या दोन ग्रा.पं. बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले होते. उर्वरीत १४ ग्रा.पं.साठी मतदान घेण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण ७४ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली.
पिंपळनेर येथे कॉँग्रेसचे माजी सभापती पराभूत
साक्री तालुक्यातील पिंपळनेर या सर्वात मोठ्या ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी उभे असलेले माजी सरपंच व पंचायत समितीचे माजी सभापती तथा जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे कट्टर समर्थक संजय ठाकरे पराभूत झाले. इंदवे ग्रा.पं.च्या निवडणुकीत कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान कृउबा सभापती पोपटराव सोनवणे यांचा उमेदवार पराभूत झाला. तर बल्हाणे ग्रा.पं.च्या निवडणुकीत विद्यमान कॉँग्रेस तालुकाध्यक्ष विलासराव बिरारीस यांचे पूर्ण पॅनल पराभूत झाले. तर राष्टÑवादी कॉँग्रेसचे जितेंद्र बिरारीस यांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहेत.