धुळे तालुक्यात ४७ हजार कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:02 PM2019-12-26T12:02:56+5:302019-12-26T12:03:15+5:30
हद्दवाढीपूर्वी या दहा गावातून चार सदस्य निवडण्यात येत होते
आॅनलाइन लोकमत
धुळे : शहरा लगत असलेली परंतु पूर्वी ग्रामीण भागात समावेश असलेल्या दहा गावांचा महानगरपालिकेच्या हद्दित समावेश झाल्याने, या दहा गावांमधील मतदार यावेळी प्रथमच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान करू शकणार नाहीत. या गावातील जवळपास ४७ हजार मतदारांना मतदान करता येणार नाही. परंतू या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार याची सध्या चर्चा सुरू आहे. या दहागावांमधून येणारे चार सदस्य कमी झाल्याने, तालुक्यातील गटांची संख्या १७ वरून १५वर आलेली आहे.
धुळे शहरा लगत असलेल्या व पूर्वी ग्रामीण भागात समावेश असलेल्या वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, अवधान, चितोड, वरखेडी, बाळापूर, मोराणे, पिंपरी या दहा गावांचा महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी महानगरपालिकेच्या हद्दित समावेश करण्यात आला.
महानगरपालिकेत समावेश होण्यापूर्वी या दहा गावांतील मतदार हे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान करीत होते. मात्र यावेळी तसे होणार नाही
निवडणुकीत एकेका मतदानाला महत्व असते. मात्र तालुक्यातील ही दहा गावे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली असून, या दहा गावे मिळून तब्बल ४७ हजारपेक्षा अधिक मतदानावर यावेळी पाणी फिरणार आहे. या कमी होणाऱ्या मतदानाचा नेमका कोणत्या पक्षाला फटका बसणार याचीही उत्सुकता लागून राहिलेली आहे.
हद्दवाढ होण्यापूर्वी या दहा गावांपैकी वरखेडी, बाळापूर, मोराणे व वलवाडी हे जिल्हा परिषदेचे चार गट अस्तित्वात होते. या चार गटाचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेत आपापल्या भागाचे प्रतिनिधीत्व करायचे. मात्र आता या गावांचे प्रतिनिधीत्व नगरसेवक करू लागले आहेत.
धुळे तालुक्यात पूर्वी १७ जिल्हा परिषदेचे गट व ३४ पंचायत समितीचे गण असायचे. मात्र नवीन फेररचनेनुसार तालुक्यातील गटांची संख्या १७ वरून १५ वर आली असून, गणांची संख्या ३४ ऐवजी ३० झालेली आहे.तालुक्याचे दोन गट कमी झाले.