Dhule: चोरट्यांची नजर, महिलांच्या दागिन्यांवर, धुळे जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये साडेसहा लाखांच्या मंगलपोत लंपास
By अतुल जोशी | Published: May 10, 2023 03:23 PM2023-05-10T15:23:20+5:302023-05-10T15:23:42+5:30
Dhule: तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील तब्बल ६ लाख २४ हजार ९८९ रूपये किंमतीच्या मंगलपोत लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अतुल जोशी
धुळे - सध्या लग्नसराईमुळे बसगाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. तसेच यात्रेनिमित्त देवदर्शनाला येणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे. मात्र या गर्दीचा फायदा चोरटे घेत आहेत. जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील तब्बल ६ लाख २४ हजार ९८९ रूपये किंमतीच्या मंगलपोत लंपास केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कावेरी वाल्मीकराव देशमुख (वय ६३, रा. हडपसर,पुणे) या ६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोंडाईचा येथून शहाद्याकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत, चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सुमारे १ लाख ५५ हजार रूपये किमंतीची मकोडा सोनपोत लंपास केली. याप्रकरणी त्यांनी ९ मे रोजी दुपारी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॅान्स्टेबल हेमंत पाटील करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत प्रिंयंका जयंत भामरे (वय २६, रा, निजामपूर) या म्हसाई माता मंदिरात आलेल्या होत्या. याठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेत प्रियंका भामरे यांच्या गळ्यातील १ लाख ८२ हजार ९३९ रूपये किंमतीचे ३२.७६० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, तसेच ६६ हजार ५८ रूपये किंमतीची मंगलपोत मधील ११.८३० ग्रॅम वजन असलेले सोन्याचे पॅन्डल असा एकूण २ लाख ४८ हजार ९८९ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी प्रियंका भामरे यांनी ९ मे रोजी निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक आय.जी.शिरसाठ करीत आहेत.
बसमधून सोने असलेले बॅग लंपास
तर तिसऱ्या घटनेत शिरपूरकडून साक्रीकडे जाणाऱ्या बस (क्र. एमएच २०-बीए १४२४) मधून प्रवास करणाऱ्या लताबाई सुरेश मोरे (वय ५३, रा. सेंधवा, जि. बडवानी) यांची बॅग लंपास केली. बॅगेतील एकूण २ लाख २१ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना ९ मे रोजी दुपारी २ ते ३.४५ वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.