धुळे महापालिकेत ‘कमळ’ फुलविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 04:14 PM2017-12-01T16:14:53+5:302017-12-01T16:16:13+5:30
अनिल गोटे : भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक; स्वबळावरच निवडणूक लढण्याचा केला निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मनपात सत्ता परिवर्तन घडवायचे आहे. जे सोबत येतील. त्यांना सोबत घेऊन व जे नाही येणार त्यांना खाली पाडून येणाºया महापालिका निवडणुकीत मनपावर कमळ फुलवून भाजपाची सत्ता आणायची आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाके कामाला लागावे. मनपात सत्ता परिवर्तन घडविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी येथे केले. दरम्यान, आगामी मनपा निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार असून या निवडणुकीत आम्ही कोणाशीही युती करणार नाही, असे त्यांनी येथे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आमदार गोटे यांची विधानसभा मतदार संघाच्या पालकपदी निवड केली. त्यापार्श्वभूमीवर आगामी मनपा व इतर निवडणुकांबाबत पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी शुक्रवारी शहरातील कल्याण भवनात भाजपाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, संजय बोरसे, रत्ना बडगुजर, माजी आमदार धरमचंद चोरडिया, दिलीप साळुंखे, योगेश मुकुंदे, भीमसिंग राजपूत, नगरसेविका वैभवी दुसाणे, प्रतिभा चौधरी, नीलम व्होरा, हिंमतराव पवार, माजी जि.प. सदस्य संभाजी पगारे, तेजस गोटे व कार्यकर्ते उपस्थित होते.
३० डिसेंबरला मनपा निवडणुकीचा विजयी बिगुल वाजवू...
आमदार गोटे म्हणाले, की सफारी गार्डनमुळे शहराच्या लौकीकात भर पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी पाठपुरावा होता. अखेर या सफाई गार्डनच्या जागेला मंजुरी मिळाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ३० डिसेंबरला सायंकाळी सात वाजता भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत तेथे उपस्थित रहावे. येताना आपआपल्या जेवणाचे डबे सोबत आणावे. हा आनंदोत्सव साजरा करताना, त्याच दिवशी येणाºया मनपा निवडणुकीचा विजयी बिगुल वाजवू, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांना दिली निवडणूक जिंकवून देण्याची ग्वाही
मुख्यमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर विधानसभा मतदार संघाच्या पालकपदाची जबाबदारी सोपविल्यानंतर मुख्यमंत्र्यांना महापालिका निवडणूक जिंंकून देण्याची ग्वाही त्यांना दिली आहे. त्यादृष्टीने पक्षीय संघटन येत्या काळात मजबूत करायचे आहे. विकासाची कास असणाºया उमेदवाराला या निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल. ज्यांनी पक्षासाठी ‘हाडाचे काडं’ केले. त्यांचाही विचार केला जाईल. त्यांना सोबत घेऊनच ही लढविण्यात येईल, असे आमदार गोटे म्हणाले.
स्वबळावरच भाजपा लढणार
केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आहे. विकासाचे वारे सर्वत्र वाहत असल्यामुळे ‘अच्छे दिन’ सुरू आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीत भाजपाला निश्चितच यश मिळेल, असे चित्र असताना भाजपा ही निवडणूक कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वबळावरच लढणार असल्याचा निर्धार, आमदार गोटे यांनी बैठकीत केला. मनपा निवडणूक ही पैशावर न लढता, मतदारांचा विश्वास संपादीत करून जिंकायची असल्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.
जी मुलगी आईचे ऐकत नाही, ती सासूचे कसे ऐकणार?
भाजपाच्या कार्यकर्त्या नीलम व्होरा यांनी पक्षात निष्ठावान कार्यकर्ते असतानाही बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना पदे किंवा उमेदवारी दिली जाते, असे सांगत खंत व्यक्त केली. त्यावर बोलताना आमदार गोटे म्हणाले, की कार्यकर्ते ही खरी पक्षाची संपत्ती आहे. त्यामुळे पक्षात बाहेरून आलेल्या कार्यकर्ते पदाधिकाºयांची परिस्थिती ‘जी मुलगी आईचे ऐकत नाही, ती सासूचे कसे ऐकणार’, अशी असल्याचे सांगत पक्षातील विरोधकांचा समाचार घेतला. पुढे त्यांनी येणाºया निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले.
मंडळनिहाय, प्रभागनिहाय बैठकांवर भर
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबरनंतर शहरात विभाग, मंडळनिहाय बैठका या शनिवार व रविवारी घेतल्या जातील. नागरिकांच्या अडचणी आमदार गोटे हे स्वत: गृहभेटी देऊन जाणून घेणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.