धुळे : ६२ वर्षीय घरमालकाचा खून करणाऱ्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 07:00 PM2023-04-28T19:00:16+5:302023-04-28T19:00:29+5:30
न्यायालयाचा निकाल; दहा हजार रुपयांचा दंड
राजेंद्र शर्मा
धुळे : घरमालक असलेले सेवानिवृत्त बँक कर्मचारी रमेश हिलाल श्रीराव (वय ६२) यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केल्याप्रकरणी धुळे न्यायालयाने आरोपी अजिंक्य शिवनाथ मेमाणे (वय २३, रा. धुळे) याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल सत्र न्यायमूर्ती एस. सी. पठारे यांनी दिला.
चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत स्टेट बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी रमेश हिलाल श्रीराव हे पत्नी प्रमिला श्रीराव यांच्यासोबत राहत होते. यांच्या घरात शिवनाथ मेमाणे हे भाडेकरू म्हणून राहत होते. रमेश श्रीराव हे दररोज फिरायला जायचे. त्यांच्यासोबत भाडेकरू शिवनाथ मेमाणे, अजिंक्य मेमाणेही असायचा. फिरून आल्यावर दोघेही घराच्या गच्चीवर व्यायाम करायचे. २२ जून २०२१ रोजी फिरून आल्यावर रमेश श्रीराव व अजिंक्य हे गच्चीवर योगा करायला गेले. अजिंक्यने रमेश यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपाने मारून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने खाली येत प्रमिला श्रीराव यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला.
काटा चमच्याने गळा चिरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड केल्याने त्या बचावल्या. याप्रकरणी धुळे शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण घटनेचा तपास एपीआय दादासाहेब पाटील यांनी केला. फिर्यादी पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. या खून खटल्यात मयताची पत्नी प्रमिला श्रीराव, जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, एलसीबीचे छायाचित्रकार, यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी युक्तिवाद केला.