Dhule: गोळी झाडून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हल्ला, कारण अस्पष्ट
By देवेंद्र पाठक | Published: May 26, 2023 07:14 PM2023-05-26T19:14:49+5:302023-05-26T19:15:10+5:30
Dhule Crime: धुळे तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत यशवंत सुरेश बागुल ( वय ३८, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक हल्ला केला.
- देवेंद्र पाठक
धुळे : तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत यशवंत सुरेश बागुल ( वय ३८, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक हल्ला केला. त्यातील एकाने कानाच्या जवळ डोक्यात गोळी झाडून तर दुसऱ्याने चाकू सारख्या धारदार हत्याराने सपासप वार केल्याने निर्घृण खून केला. ही थरारक घटना गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना घडली त्यावेळेस मयत यशवंत बागुल यांचा मामाचा मुलगा पंकज मोहिते हा सोबत होता. या घटनेमुळे तो प्रचंड घाबरला आहे. याप्रकरणी मयत यशवंतची पत्नी आशाबाई यशवंत बागुल यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
उभंड शिवारात घेतली शेती
धुळ्यातील साक्री रोडवरील मिलिंद सोसायटीत राहणारे यशवंत सुरेश बागुल यांनी धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे येथे शेती घेतली हाेती. ते आठवड्यातून दोन ते चार दिवस तिकडेच मुक्कामी राहून शेती सांभाळत होते. गुरुवारी सायंकाळी ते शेतमजूर शोधण्यासाठी त्यांचा मामेभाऊ पंकज राजेंद्र मोहिते यांच्यासोबत पिंपरखेडा येथे गेलेले हाेते. तेथून परतत असताना पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. लागलीच त्यांच्यावर हल्ला केला.
घटनास्थळावरून मॅग्झिन हस्तगत
दोघांपैकी एकाने बंदुकीतून गोळी झाडल्याने ती त्यांच्या कानाच्या जवळ बसली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. तर दुसऱ्याने चाकू सारख्या धारदार हत्याराने मानेजवळ, पोटात वार केल्याने यशवंत हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. वार जोरात बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारीच त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या गावठी कट्ट्याच्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आणि मॅग्झिन मिळून आले. धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरील परिस्थितीजन्य काही पुरावे गोळा केलेले आहे. याशिवाय पोलिसांच्या फाॅरेन्सिक, ठसे तज्ज्ञ पथकाने सुद्धा नमुने गोळा केलेले आहे. श्वान पथकानेही माग दाखवून पोलिसांच्या तपासात गती देण्याचा प्रयत्न केला आहे.
एकजण पोलिसांच्या ताब्यात यशवंत बागुल आणि हत्या करणाऱ्यांचा परिचय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना नावाने हाक मारून थांबविण्यात आले होते. बोलण्यात गुंतवून त्यांचा काटा काढल्याचे अगोदरच ठरलेले असावे. शिवाय यशवंत बागुल यांच्या हालचालीवर मारेकऱ्यांचे बारीक लक्ष असण्याची शक्यता आहे. त्याचमुळे रात्री बारीत त्यांना गाठण्यात आले.