धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कपाटे उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:29 AM2019-09-24T11:29:49+5:302019-09-24T11:29:56+5:30
नूतनीकरणाचा परिणाम : अत्यावश्यक कागदपत्रांसह फाईलींची सुरक्षितता महत्वाची
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाचे नुतनीकरण करण्यात येत असल्याने, या विभागातील सर्वच कपाटे तळ मजल्यावरच उघड्यावर ठेवण्यात आलेले आहेत. या कपाटात महत्वाच्या फाईली असून, त्यांची सुरक्षितता काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग २००९-१० पासून तळ मजल्यावर आहे. या विभागात वरच्या मजल्यावरील शौचालयाचे घाण पाण्याची गळती होत असल्याने, येथे दुर्गंधी येत होती. तसेच टेबलांचीही दुरवस्था झाल्याने, या विभागाचे नुतनीकरण करण्यात यावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी या विभागाची पहाणी करून, नुकतेच या विभागाच्या नुतनीकरणाचे आदेश दिले होते.त्यानंतर हा विभाग तळमजल्यावरीच कॉन्फरन्स हॉलमध्ये स्थलांतरीत करण्यात आलेला आहे. मात्र हा हॉलच लहान असल्याने, तेथे शिक्षण विभागाचे सर्वच कर्मचारी बसू शकत नाही. कर्मचारीच बसू शकत नाही तर कपाट ठेवणे अवघडच आहे.
त्यामुळे शिक्षण विभागाचे ३५ ते ४० लहान मोठे लोखंडी कपाट व्हरंड्यात दोन्ही बाजुला ठेवण्यात आलेली आहेत. याच मजल्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही दालन आहे. याठिकाणीही येणाºयांचे प्रमाण जास्त आहे. या कपाटांमुळे आता तळमजल्यावरील व्हरांड्यात जागा अपूर्ण पडू लागली आहे. दरम्यान या कपाटांमध्ये शिक्षण विभागाशी निगडीत महत्वाच्या फाईल्स आहेत. कुठलीही फाईल पाहिजे असल्यास कर्मचाºयांना बाहेर येवून ती फाईल न्यावी लागते, पुन्हा ठेवावी लागते. हे सर्व ठिक आहे, मात्र या महत्वाच्या फायलींची सुरक्षितता महत्वाची आहे.