धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत तुल्यबळ उमेदवारांवरच भिस्त राहणार अवलंबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:02 PM2019-12-23T12:02:45+5:302019-12-23T12:03:06+5:30
सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचण्यासाठी अहोरात्र परिश्रमाची गरज
आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपबरोबरच महाविकास आघाडीलाही त्याच तोडीचे तुल्यबळ उमेदवार द्यावे लागतील. तरच त्यांचे सत्ता स्थापण्याचे स्वप्न साकारू शकेल, अशी चर्चा आहे.
भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांतर्फे नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पार पडलेला आहे. संभाव्य उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झालेली असल्याची चर्चा आहे. त्यात कोणा-कोणाला संधी मिळते याकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपसह महाविकास आघाडी त्याचबरोबर विविध लहान-लहान पक्षही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवाय अपक्षांची भाऊ गर्दीही मोठ्या प्रमाणावर असेल. या सर्वांमुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पक्षाला गट व गणात तुल्यबळ उमेदवार द्यावे लागणार आहे.
ेगेल्यावेळी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल भाजपला जागा मिळाल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. शिवसेना, कॉँग्रेस व राष्टÑवादी हे तीनही पक्ष एकत्र येत त्यांनी महाविकास आघाडीची मोट बांधलेली आहे. तर भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. असे असले तरी दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने, त्यांना त्यानुसारच उमेदवार द्यावे लागतील.पक्ष कितीही मोठा असला तरी स्थानिक उमेदवाराचा संपर्क, त्याने आतापर्यंत केलेली समाजपयोगी कामे याचा विचार करूनच अनेकजण मतदान करीत असतात, हे वास्तव आहे. भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने, या निवडणुकीत भाजपला सर्वच गट व गणांमध्ये तुल्यबळ उमेदवारच द्यावे लागतील. तरच सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहचण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होवू शकणार आहे.