धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉँग्रेसतर्फे ५४३ इच्छुकांनी दिल्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:48 AM2019-12-10T11:48:05+5:302019-12-10T11:48:25+5:30
मुलाखती देण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सकाळपासूनच झाली गर्दी,
आॅनलाइन लोकमत
धुळे : राज्यात कॉँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने, पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुलाखत देण्यासाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. जिल्ह्यातील ५६ गटासाठी १८५ तर ११२ गणांसाठी तब्बल ३५८ अशा एकूण ५४३ इच्छुकांनी सोमवारी मुलाखती दिल्या.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कॉँग्रेसने कंबर कसलेली आहे. सुरवातीला जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये मेळावे घेऊन निवडणुकीची वातावरण निर्मिती केली. तर सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
पक्षाचे निरीक्षक माजी आमदार कल्याण काळे, माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार डी.एस. अहिरे, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी इच्छुकांच्या तालुकानिहाय मुलाखती घेतल्या.
सर्व प्रथम धुळे तालुक्यातील गट- गणांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर शिंदखेडा, साक्री व शिरपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
जिल्ह्यातील ५६ गटांसाठी १८५ जणांनी मुलाखती दिल्या. यात साक्री तालुक्यातील १७ गटांसाठी ६५, धुळे तालुक्यातील १५ गटांसाठी ६०, शिंदखेडा तालुक्यातील १० गटांसाठी ३० व शिरपूर तालुक्यातील १४ गटांसाठी २८ जणांनी मुलाखती दिल्या.
तर ११२ गणांसाठी २५३ जणांनी मुलाखती दिल्या. त्यात साक्री तालुक्यातील ३४ जगांसाठी १०२, धुळे तालुक्यातील ३० जागांसाठी १२०, शिंदखेडा तालुक्यातील २० जागांसाठी ८० व शिरपूर तालुक्यातील २८ जागांसाठी ५६ जणांनी मुलाखती दिल्या.
महिलांचीही प्रचंड गर्दी
मुलाखती देण्यासाठी जिल्ह्यातील महिलाही मोठ्या संख्येने कॉँग्रेस भवनात दाखल झालेल्या होत्या. या मुलाखतींमुळे कॉँग्रेस भवन अनेक महिन्यानंतर गजबजलेले दिसून आले.