धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:55 AM2020-01-21T11:55:48+5:302020-01-21T11:56:07+5:30
दोन्ही पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात झाले स्वागत,विकास कामे राबविण्याचा उभयतांचा मनोदय
आॅनलाइन लोकमत
धुळे :जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षपदाचा पदभार डॉ. तुषार रंधे यांनी तर उपाध्यक्षपदाचा पदभार कुसुमबाई कामराज निकम यांनी सोमवारी सायंकाळी आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत स्वीकारला. तब्बल सात महिन्यानंतर जिल्हा परिषदेला अध्यक्ष-उपाध्यक्ष लाभले आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ५६ पैकी ३९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे यांची तर उपाध्यक्षपदी कुसुमबाई निकम यांची निवड करण्यात आली होती. लक्ष लागून होते ते पदभार घेण्याकडे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याने, सकाळपासूनच दालने सजविण्यात आली होती. दालनामध्ये आकर्षक फुलांचे तोरण व फुगे लावले होते.
सायंकाळी आगमन
डॉ. तुषार रंधे यांचे सायंकाळी ४.१० वाजता जिल्हा परिषदेत आगमन झाले.फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांनी स्वागत केले.
अध्यक्षांच्या दालनात आगमन झाल्यानंतर आमदार जयकुमार रावल यांनी डॉ. तुषार रंधे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसविले.
सीईओंकडून अध्यक्ष, उपाध्यक्षांचे स्वागत
अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर डॉ. रंधे, उपाध्यक्षा निकम या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आल्या असता या दोघांचेही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी.यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
उपाध्यक्षांनीही पदाची
सूत्रे घेतली
यानंतर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुसुमबाई कामराज निकम यांनीही आपल्या दालनात येत पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी आमदार जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान जिल्ह्यात विकासाची कामे करण्यात येतील असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी दिले आहे.