धुळे जि.प. निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:17 PM2019-12-03T13:17:19+5:302019-12-03T13:17:37+5:30
राज्यात सरकार स्थापन झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला
आॅनलाइन लोकमत
धुळे :राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने, शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसलेली आहे. निवडणुकीच्या नियोजनासाठी शिवसेनेने बैठकांवर भर दिला आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल २६ दिवसानंतर धुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्याच्या पंचायत समितींच्या निवडणूका जाहीर झाल्या. मात्र तोपर्यंत राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नव्हता. त्यामुळे शिवसेनेसह सर्वच पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शांतता होती. मात्र २८ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेचा विशेष म्हणजे पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाल्याने, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितींवर भगवा फडकविण्यासाठी शिवेसेनेने कंबर कसलेली आहे. या निवडणुकांच्या नियोजनासाठी तालुकास्तरीय बैठकांचे नियोजन करण्यात येत असून, त्यात रणनिती ठरविण्यात येत आहे. सध्या तरी शिवसेनेने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या नियोजनाबाबत आघाडी घेतलेली दिसून येते. दरम्यान २०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र आता शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालेले असून, पक्षाकडूनही अपेक्षा वाढलेल्या आहेत. यावेळी शिवसेना किती जागांवर विजय मिळविणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
भाजपशी टक्कर
राज्यात ज्याप्रमाणे शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, तसाच प्रयोग स्थानिक स्वराज्य संस्थेत केला जाईल असे राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात तीनही पक्ष एकत्रितपणे लढणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सर्वच पक्ष आपापल्यापरीने तयारीला लागले आहेत. मात्र या सर्वच पक्षांचा सामना भाजपशीच असणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अत्यंत चुरशीच्या होतील असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. यात कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.