धुळेकरांना वाढत्या तापमानाचा ‘ताप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:35 PM2019-04-24T22:35:08+5:302019-04-24T22:36:07+5:30
एप्रिल ‘हॉट’ : कमाल ४२़२ अंशांसह नवा उच्चांक, घराबाहेर निघणेही अवघड
धुळे : धुळेकर सध्या वाढत्या तापमानाचा ताप सहन करीत असून मंगळवारी तापमानाच्या पाऱ्याने या मोसमातील उच्चांक गाठला़ कमाल तापमान ४२़२ व किमान तापमान १८़४ अंश सेल्सीअस इतके नोंदविण्यात आले़
रखरखत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असून ‘एप्रिल हॉट’मुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत़ त्यामुळे दुपारी १२ वाजेपासूनच वर्दळीचे रस्ते ओस पडत आहे़ हवामान खात्याने उत्तर मध्य महाराष्ट्रात आठवड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला होता, मात्र १९ एप्रिलला तापमानाने उच्चांक गाठल्याने धुळेकरांना चटके बसत आहे़ त्यामुळे थंडगार पाणी, आईस्क्रिम पार्लर, रसवंती, शितपेयांची दुकाने, लिंबूपाणी, गोला या शितपदार्थांना मागणी वाढली आहे़ सकाळपासूनच उन्हाची दाहकता जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत़
नागरिक शक्य तेवढी कामे लवकर आटोपून घराकडे परतत असल्याने १२ ते ५ वाजेपर्यंत वर्दळ कमी होत असून शहरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती दिसून येते़
मे महिन्यातील तापमान एप्रिलमध्येच सोसावे लागत असून मे महिन्यात तापमान पन्नाशी गाठणार की काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे़
महिन्यात दुसऱ्यांदा तापमाना वाढ
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यातच तापमानाने चाळीशी पार केली असून एप्रिलमध्ये देखील दरदिवशी तापमान जवळपास चाळीशीच्या पुढेच राहिले आहे़ त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे अधिकच भर पडली आहे़ एप्रिल महिन्यात तापमानाचा उच्चाक गाठत मंगळवारी तापमान ४२.० अंशावर पोहलचे होते़ यापुढे देखील तापमानाने उच्चांक गाठण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़