धुळे येथे दिव्यांगाच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:37 AM2019-03-06T11:37:12+5:302019-03-06T11:38:03+5:30
पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आंदोलनाची दखल
आॅनलाइन लोकमत
धुळे : तालुक्यातील नवे कोठारे येथील दिव्यांग व्यक्तीस मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, तसेच पुणे येथे दिव्यांगावर लाठी हल्याचा आदेश देणारे अधिकारी व हल्ला करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे यासह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज क्युमाईन क्लबसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, नवे कोठारे येथील दिलीप रामभाऊ दगडे या दिव्यांग व्यक्तीस बोरसुले (ता. धुळे) येथील ग्रामसभेत उपसरपंच सुनील दाजू गोयेकर यांनी मारहाण केली. यासंदर्भात उपसरपंचावर सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर उपसरपंच गोयेकर हा दिलीप यास जीवे मारण्याची धमकी देतो. यासंदर्भात पोलिसांना निवेदने देण्यात आली. मात्र अद्यापही संबंधितावर कारवाई झालेली नाही. उपसरपंच गोयेकर व त्याच्या साथीदार व नातेवाईकांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच ग्रामसेवक गोकूळ झालसे याने दिलीप दगडे याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे ग्रामसेवकाची चौकशी करून त्याला निलंबित करण्यात यावे.
पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तालयासमोर धरणे आंदोलन करणाºया दिव्यांगावर अमानुषपणे लाठी हल्ला करण्यात आल. त्यात अनेक दिव्यांग जखमी झाले. लाठी हल्ला करण्याचा आदेश देणारे अधिकारी व लाठी हल्ला करणारे पोलीस यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच लाठी हल्यात जखमी झालेल्या दिव्यांगाना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. वरील मागण्या पूर्ण झाल्यानाही तर आमरण ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड, अॅड.कविता पवार, प्रशांत जगताप, संजय सरग, दिलीप दगडे, भूषण अहिरे, संजय विभांडीक, संजय सोनवणे, संजय कांकरिया, मयूर खरात, चेतन देसले, राजेंद्र हालोरे, सतिलाल पदमोर आदी उपस्थित होते.