दर घटल्याने शेतक-यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:40 PM2018-12-16T16:40:41+5:302018-12-16T16:41:16+5:30
जेमतेम आवक : सहा महिने साठवूनही अपेक्षित दर मिळेना, सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/पिंपळनेर : दरात घट झाल्याने धुळे व पिंपळनेर येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची पूर्वीच्या तुलनेत आवक जेमतेम होत आहे. सहा महिने चाळींमध्ये कांदा साठवूनही अपेक्षित भाव मिळत नसून कांदा सडू लागल्याने शेतकºयांना तो विक्री केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आहे. अशा स्थितीत सरकारने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा कांदा उत्पादकांमध्ये व्यक्त होत आहे.
धुळे बाजार समितीत सध्या कांद्याच्या आवकमध्ये चढउतार होत आहे. कधी १४५० क्विंटल तर कधी साडेसहा हजार क्विंटल अशी गेल्या आठवड्यात आवक झाली. तर पिंपळनेर उपबाजार समितीत सध्या रोज ३० ते ४० वाहन कांद्याची आवक होत आहे. मात्र मिळणाºया दरातून शेतकºयांचा कुठलाही खर्च निघत नसून तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने अशा परिस्थितीत शेतकºयांना मदतीची भूमिका घ्यावी, अशी मागणीही होत आहे. जुन्या कांद्याला अत्यल्प भाव असून नवीन कांद्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. मात्र त्यात कोणताही खर्च निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामुळे भरडला जात आहे.
चाळींमधून कांदा बाहेर
कांदा सहा महिने चाळीमध्ये साठवूनही शेतकºयांना कुठलाही प्रकारचा जास्तीचा भाव मिळालेला नाही. उलट आहे त्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आजही बहुतांश चाळींमध्ये कांदा दिसत असून त्यात मोठ्या प्रमाणात सड आहे.
नवा कांदा बाजारात येऊ लागल्याने जुन्या कांद्याचे भाव गडगडले.तसेच नव्या कांद्यालाही भाव नसल्याने एकंदरीत कांदा उत्पादक शेतकºयांंमध्ये सरकारप्रती नाराजी आहे. कांदा निर्यात सुरू करावी तसेच असलेल्या कांद्याला भाव मिळावा यासाठी शेतकरी हा सरकार काही निर्णय घेईल, याची प्रतीक्षा होत आहे, सध्या उन्हाळी कांद्याची लागवड सुरू असल्याने भविष्यात या कांद्याला भाव मिळेल किंवा नाही, अशी शंका आहे. मात्र तरी शेतकºयांनी यंदाही कांदा लागवडीचे सूत्र हाती घेतले आहे. पण सरकारने येऊ घातलेल्या कांद्याला भाव द्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकºयांकडून वर्तविली जात आहे. ग्रामीण भागात शेतकºयांच्या असंख्य समस्या असून त्या सोडविण्यासाठी शेतमालाला भाव मिळेल, अशी मागणी आता शेतकºयांमधून होऊ लागली आहे.