मोगलाईसह शहरात घाणीचे साम्राज्य, कचराकुंड्या ओव्हरफ्लो : नियमित स्वच्छता करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:42+5:302021-05-26T04:35:42+5:30
मोगलाईतील जुन्या पोलीस चौकीजवळ मोकळ्या जागेत महानगरपालिकेने मोठ्या कचरा कुंडीची व्यवस्था केली आहे. परिसरातील नागरिक याठिकाणी कचरा टाकतात. परंतु ...
मोगलाईतील जुन्या पोलीस चौकीजवळ मोकळ्या जागेत महानगरपालिकेने मोठ्या कचरा कुंडीची व्यवस्था केली आहे. परिसरातील नागरिक याठिकाणी कचरा टाकतात. परंतु कचरा कुंडीतील कचरा अनेक दिवसांपासून काढलेला नाही. कचरा ओव्हरफ्लो होत आहे, त्यामुळे कचराकुंडीच्या चौफेर घाण साचलेली आहे. या घाणीत सातत्याने मोकाट डुकरांचा वावर आहे. परिसरात नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. घंटागाडीदेखील नियमित येत नाही. सफाई कर्मचारीदेखील फिरकत नाहीत. महानगरपालिकेचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
तसेच संतोषी माता चौकाकडून गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंध शाळेच्या समोर असलेल्या कचराकुंडीची देखील तीच परिस्थिती आहे. ओला आणि सुका कचरा कुंडीतून बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी खासगी रुग्णालये, मोठ्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तरी देखील घाण साचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कचरा आणि स्वच्छतेचा प्रश्न केवळ मोगलाई, साक्री रोड आणि गणपती मंदिर रोडपुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरात परिस्थिती वाईट आहे. कोरोनाच्या काळात घंटागाडीवर काम करणारे वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर तसेच नियमित वेतन न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या कारणामुळे घंटागाड्यांच्या फेऱ्या देखील कमी झाल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घंटागाड्या येत नसल्याने घरोघरी कचरा पडून असतो. दुर्गंधी येऊ लागली की सदरचा कचरा शहरातील कचराकुंड्यांमध्ये टाकला जातो. घंटागाडी नियमित येत नसल्याने कचरा कुंड्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कचराकुंड्या ओव्हरफ्लो झाल्या आहेत.
कोरोनाच्या संसर्गात स्वच्छता राखण्याचे आवाहन करणाऱ्या महानगरपालिकेला मात्र स्वत:च्या जबाबदाऱ्यांचा विसर पडल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.