दिव्यांग, बचत गट, महिलांना रेशन दुकानाचे परवाने द्या,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:29+5:302021-09-27T04:39:29+5:30
धुळे : शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला चांगल्या प्रतीचा धान्य पुरवठा होईल, असे नियोजन पुरवठा विभागाने करावे. धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ...
धुळे : शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबाला चांगल्या प्रतीचा धान्य पुरवठा होईल, असे नियोजन पुरवठा विभागाने करावे. धान्य साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गोदामांची सुरक्षा तपासून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. स्वस्त धान्य दुकानाचे परवाने देताना दिव्यांग, महिला बचत गट, महिलांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
मंत्री भुजबळ यांनी रविवारी सकाळी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार साहेबराव सोनवणे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या काळात पुरवठा विभागाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. राज्यात ५४ हजार स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना धान्य पुरवठा केला जातो. त्यामुळे स्वस्त धान्य दर्जेदार दिले गेले पाहिजे. त्यासाठी पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी. गोदाम स्वच्छ राहतील, याची काळजी घ्यावी. गोदामांवर आवश्यक मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वस्त धान्य दुकानाचे परवाने देताना दिव्यांग, महिला बचत गट, महिलांना प्राधान्य द्यावे. काही शिधापत्रिकाधारक नियमितपणे स्वस्त धान्य दुकानावरील धान्य घेत नाही. अशा शिधापत्रिकांचा शोध घ्यावा. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गरजूंना दर्जेदार भोजन देण्यात यावे. त्यासाठी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवभोजन केंद्रांना नियमितपणे भेटी देऊन भोजनाची गुणवत्ता तपासावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात ९८१ स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयच्या ७७ हजार १८१, प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची २ लाख १६ हजार २९७, केशरी कार्डधारकांची संख्या १ लाख २९ हजार १७७ एवढी आहे. याशिवाय शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या १७ हजार ३९३ एवढी आहे. धुळे जिल्ह्यात शासकीय गोदामांची संख्या १७ असून पिंपळनेर येथील गोदाम दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. दोंडाईचा येथील गोदामाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव मागविण्यात आला आहे. शिवभोजन केंद्रांची संख्या २८ असून दररोज ३,८०० थाळ्यांचे गरजूंना वितरण केले जाते, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.