अक्कलपाडा विषय विखंडीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:36 PM2019-03-08T22:36:57+5:302019-03-08T22:37:40+5:30
महापालिका : जिल्हाधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन
धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची निविदा १५ टक्के जास्त दराने मंजूर केली आहे़ या निणर्याने मनपाचे आर्थिक नुकसान तर ठेकेदारांचे हित जोपासले जाणार असल्याने हा विषय मनपा अधिनियम ४५१ नुसार विखंडीत करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले.
महानगरपालिकेने अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी १२७ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती. प्रशासाकीय सदर निविदा नियमाप्रमाणे देशातील प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध न करता वैयक्तिक आर.एम. घुले या ठेकेदाराला फायदा मिळवून देण्यासाठी प्रशासनातील काहींनी हितसंबंध जोपासले. १२७ कोटी रुपयांच्या पाणी योजनेत जवळपास ८० कोटी खर्चून सुद्धा मागील चार वर्षात धुळेकरांना पाणी मिळालेले नाही.
उच्च न्यायालयात तक्रार केली, तक्रारीची दखल घेत राज्य शासनाने अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांना चौकशीसाठी नियुक्त केले होते. त्यांनी चौकशी करून ३० मार्च २०१६ रोजी अहवाल राज्य शासनाकडे पाठवून त्यात गैरप्रकार झाल्याचे नोंदवत संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश दिले असून सुद्धा अहवाल दडपून ठेवण्यात आले आहेत. मागील महासभेत ठेकेदाराविरुद्ध ठराव करण्यात आले आहे़ प्रशासनाने चुकीची निविदा तयार करून मनपाने १२७ कोटींची योजना १३६ कोटींमध्ये मंजूर करून मनपा अधिनियम कायद्याचे उल्लंघन केले आहे.
दरम्यान निविदा ४.९९ पेक्षा जास्त दराने मंजूर करता येत नाही हे माहिती असून ही आयुक्तांनी ठेकेदाराची बाजू उचलून त्याला लाभ मिळवून दिला आहे़ त्यामुळे १८ कोटींचा भुर्दंड मनपाला भोगावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे़ निवेदनावर संजय गुजराथी, सुनील राजपूत, धिरज पाटील, गुलाब माळी, प्रफुल्ल पाटील, राजेश पटवारी, संदीप चव्हाण, भरत मोरे, नरेंद्र परदेशी, अ.दि. सोनवणे, रविंद्र काकड, किशोर सपकाळे आदींच्या सह्या आहेत.