दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 09:21 PM2020-04-15T21:21:31+5:302020-04-15T21:23:09+5:30
शिवसेनेचा उपक्रम : अंध, मुकबधिर बांधवांनाही लाभ, घरपोच केली मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाउनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या मदतीला शिवसेना सरसावली आहे़
शिवसेनेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे अंध, अपंग, दिव्यांग आणि मूकबधिर बांधवांच्या कुटूंबियांच्या परिवारासाठी मंगळवारी किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले़
धुळे शहरासह जिल्ह्यात हा सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी केला आहे. जवळ जवळ दोन ते तीन हजार कुटुंबांसाठी हा उपक्रम असणार आहे़ शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शाखाप्रमुखांना याआधी यासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार मंगळवारपासुन वाटप सुरू झाले आहे़
जुने धुळे, मिल परिसर, ग्रामीण भागात आर्वी, पुरमेपाडा मोराणे या गावांपासुन उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे़
शिवसेनेच्या या उपक्रमाला अंध, अपंग, दिव्यांग बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला़ गावागावात प्रत्यक्ष घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू, दोन किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, अर्धा किलो तेल, मिरची, हळद असा किराणा वाटप करण्यात येत आहे़
किराणा वस्तूंचे वाटप करताना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह अतुल सोनवणे, राजेंद्र पाटील, रवींद्र काकड, गुलाब माळी, नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, रवींद्र माळी, प्रफुल्ल पाटील, जवाहर पाटील, महावीर जैन, केशव माळी, भटू गवळी, राकेश माळी, दिनेश कोळेकर, प्रदीप फुलपगारे विक्की पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत़
लॉकडाउनमध्ये अंध, अपंग, मुकबधिर बांधवांच्या कुटूंबियांची परवड होत असल्याने त्यांना मदत करण्याचे आवाहन दिव्यांग संघटनांनी केले होते़ त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे़ शिवसेनेने चांगला पुढाकार घेतला असून त्यांच्या कार्याचे स्वागत होत आहे़