जिल्हा प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:55 PM2019-06-27T18:55:08+5:302019-06-27T18:55:28+5:30
शरद पाटील यांची मागणी : कर्मचाºयांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील बाभळे औद्योगिक वसाहतीमधील अभय न्युट्रीशियन प्रा.लि. कंपनीच्या कर्मचाºयांचे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, संपास पाच दिवस उलटूनही प्रशासनाने याबाबत दखल घेतलेली नसून जिल्हाधिकाºयांनी याप्रश्नी त्वरित लक्ष घालावे, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडीतराव पाटील यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
याबाबत त्यांनी म्हटले आहे की, नरडाणा एमआयडीसीत अभय न्युट्रिशियन प्रा.लि. अर्थात अभय कोटेक्स या नावाने पशुखाद्य निर्मिती करणाºया कंपनी व्यवस्थापनाने गेल्या सात वर्षाच्या काळात नरडाणा येथील उद्योगात सातत्याने मालाची निर्मिती होत असतांना ती स्वत:च्या, अन्य कंपनी फर्मच्या माध्यमातून विक्री करुन येथील अभय न्युट्रीशियन ह्या कंपनीच्या कामगारांना वेतन न देता कंपनी दिवाळखोरीत काढण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत. यामुळे सुमारे दीडशे ते दोनशे कामगारांचे भविष्य पणाला लागले आहे. तसेच या कंपनी व्यवस्थापनाने शेतकºयांकडून पालन पोषणासाठी घेतलेल्या गायींची उपासमार होत आहे. कंपनीच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. सदर संपास पाच दिवस उलटूनही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. तरी जिल्हाधिकाºयांनी सदर प्रश्नी त्वरित लक्ष घालावे, अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होईल. अभय न्युट्रीशियन प्रा.लि. या कंपनीने बाभळे फाटा येथे पशुखाद्य निर्मितीचा उद्योग उभारला. सुरुवातीला कंपनीच्या बाबी नियमित असल्याने परिसरातील बेरोजगारानी या कंपनीत रोजगाराला प्राधान्य दिले. परंतू मुळातच चांगला हेतू डोळ्यासमोर न ठेवता काम करणाºया जालना येथील मुळ नोंदणीकृत अभय न्युट्रीशियन प्रा.लि. या कंपनीने बाभळे येथे अभय कोटेक्स नावाने उत्पादने सुरु केली. सुरुवातीला काम करणाºया सुमारे १३० कर्मचाºयांना २०१३ मध्येच कायम केले. परंतू संघटनेने वारंवार तगादा लावल्यानंतर २०१८ मध्ये त्यांना कायमचे आदेश देण्यात आले. या काळात कर्मचाºयांकडून अत्यल्प वेतनात काम करुन घेतले. विशेष म्हणजे कंपनीत मालाची निर्मिती होत असताना कायम कर्मचाºयांना कामावर न घेण्याच्या हेतूने कंपनी दिवाळखोरीत काढण्याचे षडयंत्र रचले, असेही शरद पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.