समितीकडून जिल्ह्याची दुष्काळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:33 PM2018-12-07T12:33:41+5:302018-12-07T12:34:30+5:30
शेतीची पाहणी करीत शेतक-यांशी संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : केंद्र सरकारचे दुष्काळ पाहणी पथक आज धुळे जिल्ह्याच्या दौैºयावर होते. या पथकातील सदस्यांनी धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त वणी व लळिंग शिवारातील शेतीची पाहणी करीत तेथील शेतकºयांशी संवाद साधला.
केंद्र सरकारचे दुष्काळ पाहणी पथक राज्याच्या दौºयावर आहे. या पथकाने आज सकाळी जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर या तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केली. त्यानंतर या पथकाचे धुळे जिल्ह्यात आगमन झाले. या केंद्रीय पथकात कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा, कडधान्य विकास संचालनालयाचे संचालक ए. के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्या शालिनी सक्सेना, केंद्रीय जलसमितीचे संचालक आर.डी. देशपांडे यांचा समावेश होता.यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.या पथकातील सदस्या तथा कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव झा यांनी शेतकºयांशी संवाद साधला. शेतीत काय पेरा केला होता, किती पाऊस झाला, किती उत्पन्न आले, गेल्या वर्षी किती उत्पन्न आले होते. पीक पध्दती, आंतरपिके, पाणी वापराच्या पध्दती, पीक विमा, पीक कर्ज याविषयी सविस्तर माहिती घेत शेतकºयांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले, या भागात जलयुक्त शिवार अभियानाची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र, या वर्षी पुरेशा पावसाअभावी पाण्याची तीव्रता जाणवत आहे, असे नमूद केले. वणी येथे राजेंद्र कटारिया यांच्या शेतात, तर लळिंग येथील अभिमन भिल यांच्या शेताची पाहणी या पथकाने केली. यावेळी लळिंगचे सरपंच झेंडू सोनवणे यांच्यासह लळिंग व अवधान परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.