जिल्ह्याची ‘लक्ष्मणरेषा’ ठरतेय असुरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:14 PM2020-04-10T22:14:00+5:302020-04-10T22:14:36+5:30

संचार बंदीचा एकाही व्यक्तीवर कारवाई नाहीच

District's 'Laxman Line' is becoming insecure! | जिल्ह्याची ‘लक्ष्मणरेषा’ ठरतेय असुरक्षित!

dhule

Next

धुळे : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे़ त्यात पुणे, मुंबई, नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे़ अन्य शहरामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हयाच्या सीमा सील करुन बाहेरच्या नागरिकांना प्रवेशाची मनाई करण्यात आली आहे़ असे असतांनाही १ ते ८ एप्रिल या कालावधीत पुणे मुंबई, नाशिकसह अन्य शहरातून धुळे शहरात तब्बल ३० नागरिकांनी प्रवेश केल्याची माहिती मनपाच्या सुत्रांकडून मिळाली आहे़ मात्र मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीविरुद्ध पोलिस प्रशासनाकडून कारवाई झालेली आढळून येत नाही़ त्यामुळे जिल्ह्याची लक्ष्मणरेषा असुरिक्षत ठरत आहे़
लॉकडाऊन नावालाच
देशात व राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. धुळे जिल्ह्यालाही आता कोरोना विषाणूने विळखा घातल्याने नागरिकांना अधिक दक्षता घेण्याची गरज आहे़ शहराबाहेर साक्रीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग, पोलीस, महसूल विभागासह अन्य विभागाची झोप उडाली आहे़
बंदोबस्त वाढविण्याची गरज
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेळोवेळी घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे़ मात्र तरीही शहरात आजही नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरतांना दिसतात़ शहरातील मुख्य चौकात पोलिस बंदोबस्त सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यत दिसुन येतो़ त्यानंतर सायंकाळी ४ ते १०. ३० पुन्हा कॉलनी परिसरात नागरिकांची वर्दळ होते़ त्यामुळे आजही नागरिकांनी कोरोनाबाबत गांर्भीयांने घेतलेले दिसुन येत नाही़
मनाई आदेश नावालाच!
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागु करण्यात आला आहे़ शाळा, महाविद्यालय, दैनदिनी व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे़ तर केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत़ असे असतांना ही भाजी, दुध व अन्य फळ विक्रेत्याकडे ओळखपत्र किंवा परवाना नसतांना शहरात फिरतांना दिसुन येतात तर पेट्रोल पंपवर पेट्रोल सहज मिळत असल्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या आजही आहे़
सीमा बंद चा केवळ देखावा
जिल्ह्याच्या पन्नास किमी अंतरावर साक्री, मालेगाव तसेच जळगाव, मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे़ जिल्ह्याला अशा चारही बाजूला कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत़ केवळ नंदुरबार जिल्हा आणि धुळे शहर आता अपवाद राहीले आहे. नंदुरबार आणि शिरपूर तालुका मध्यप्रदेश राज्याची सीमाजवळ आहेत़ तर धुळ्यापासून जळगाव शंभर व मालेगाव व साक्री धुळे शहरापासून ५५ किमी अंतरावर आहे़ अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दररोज वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे़ त्यामुळे धुळे व नंदूरबार जिल्ह्याचा धोका अधिक वाढला आहे़ पोलिस प्रशासनाकडून वेळीच शंभर टक्के सीमा बंद न केल्यास मोठ्या प्रमाणात अनर्थ घडू शकतो़
९ दिवसात ३० जणांचा प्रवेश
अचानक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने पुणे, मुंबई शहरात अडकुन पडले आहेत़ नागरिकांनी खाजगी वाहनाद्वारे १ ते ९ एप्रिल या कालावधीत पुणे, मुंबई, नाशिक, नगर तसेच जळगाव शहरातून आतापर्यत ३० नागरिक धुळे शहरात छुप्या पध्दतीने दाखल झाले आहे़ याबाबत प्रशासनाकडे ३ ते ४ दिवसांनतर माहिती मिळाली़ पोलिसांकडून सीमा बंद असतांनाही परजिल्ह्यातून ३० जणांनी धुळे शहरात कसा प्रवेश केला? पोलिस नेमके नाकाबंदीच्या ठिकाणी होते का? पोलिसांना खाजगी वाहन दिसत असतांनाही का सोडण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ कोरोनाचे संकट जवळ येवून ठेपले आहे़ आता सीमा व अन्य मार्ग बंद न केल्यास शहरात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
त्यांची माहिती तत्काळ कळवा
जिल्ह्या लगतच्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरून शहरात आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्या़ जिल्ह्यालगतच्या मालेगाव, नाशिक, जळगाव, सेंधवा या शहर व जिल्ह्यांच्या सरहद्दीवर कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या परिसरातून तसेच इतर राज्य व देश येथूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यात आलेले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: District's 'Laxman Line' is becoming insecure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे