देवपुरात चोरट्यांची दिवाळी रोकडसह साड्या लांबविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:09 PM2019-10-29T12:09:47+5:302019-10-29T12:10:06+5:30
नकाणे रोडवरील केले नगरातील घटना : ३५ हजारांचा होता ऐवज
धुळे : देवपुरातील नकाणे रोडला लागून असलेल्या केले नगरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३५ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे़ शुक्रवारी दुपारी याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त किशोर जगन्नाथ वडनेरे (६६) यांचे नकाणे रोडवर केले नगरात घर आहे़ १३ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता घराला कुलूप लावून वडनेरे कुटूंबिय गावी गेले होते़ ही संधी साधत चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान करीत कपाटात सुरक्षित ठेवलेले १५ हजाराची रोकड, लग्नाचा शालू तसेच महागाड्या साड्या असा एकूण ३५ हजाराचा ऐवज चोरट्याने शिताफिने लांबविल्या़ वडनेरे कुटूंबिय घरी परत आल्यानंतर तुटलेले कुलूप आणि घरात अस्ताव्यस्त पडलेले साहित्य लक्षात घेता, घरात चोरी झाल्याचे समोर आले़ त्यांनी तातडीने पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली़ पोलीस निरीक्षक कुबेर चवरे आणि पथकाने घटनास्थळी येवून पाहणी केली़ परंतु चोरट्यांना चोरी झाल्याचा ठोस पुरावा हाती लागलेला नाही़ याप्रकरणी किशोर वडनेरे यांच्या तक्रारीवरुन पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला़
दरम्यान, अगदी याच पध्दतीने देवपुरातील मंगलमुर्ती कॉलनीत घरफोडी झाली होती़ घरमालक जोशी हे बाहेरगावी गेले होते़ तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या घरात चोरी केली होती़ काही महिन्यांपुर्वीची ही घटना आहे़ दिवाळी सण असल्याने बहुतेक जणं गावाला जात असल्याने घर बंद दिसत आहे़ ही संधी साधून चोरटे हातसफाई करीत असल्याने त्यांचीही दिवाळी साजरी होत असल्याचे घटनांवरुन समोर येत आहे़