पिंपळनेर परिसरात गालबोट लागू देवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 09:26 PM2019-11-04T21:26:26+5:302019-11-04T21:26:48+5:30
शांतता समितीची बैठक : हिंदू-मुस्लिम बांधवांना पोलिसांनी केले शांततेचे आवाहन
पिंपळनेर : येथील पोलिस ठाण्याच्यावतीने ईद ए मिलाद व राम मंदिर व बाबरी मशिद संदर्भात न्यायालयीन निकाल असल्याच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी राठोड यांनी मुस्लिम बांधवांचा धार्मिक सण असल्याने सर्वत्र उत्सव हा शांततेत साजरा करावा तसेच याच आठवड्यात राम मंदिर व बाबरी मशिदीसंदर्भात न्यायालयीन निकाल लागण्याची शक्यता असल्याने निकाल कोणत्याही बाजूने लागला तरी गावात शांतता राहावी़ तसेच तरुण वर्गाने ही सोशल मीडियावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असे कोणतेही कृत्य, कोणतीही पोस्ट व्हायरल करु नये, उद्रेक होणार नाही असे मेसेज टाकू नये असे आढळल्यास याला सर्वस्वी ग्रॅपचा अॅडमिन जबाबदार राहील असेही राठोड यांनी स्पष्ट केले.
उपस्थित मुस्लिम बांधवांकडून कमिटीच्या बैठकीत आश्वासन देण्यात आले की, न्यायालयीन निर्णयाचे स्वागत करण्यात येईल व कुठलीही हानी होणार नाही. तसेच मुस्लीम बांधवांचे प्रतिनिधी अमजद पठाण, भाजपा शहराध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, ज्येष्ठ नागरिक सुभाष जगताप, संभाजीराव अहिरराव यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना आवाहन केले़ मुस्लिम बांधवांनी सण आनंदात साजरा करावा़ शांतता ठेवावी असेही यावेळी सांगण्यात आले.
माजी सरपंच सतिष शिरसाठ, अल्ताफ शेख, कमलाकर पेंढारकर, राजेंद्र गवळी, संभाजी अहिरराव, शब्बीर शेख, अमजद खान, सलीम काजी, प्रमोद गांगुर्डे, माझ शेख, इलियास तांबोळी, जुनेद कुरेशी, सोयाब खाटीक, वाजिद पठाण, लियाकत सय्यद, फैजल शेख यासह मुस्लीम बांधव तसेच शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. आभार पोलीस उपनिरीक्षक भानुदास नºहे यांनी मानले़