शासनाच्या क्रांतिकारक जलयुक्त शिवार योजनेत कमी पडू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 04:09 PM2017-11-11T16:09:50+5:302017-11-11T16:11:17+5:30
मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे : जलयुक्त शिवार अभियानाची नाशिक विभागीय आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : राज्य जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनातर्फे मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतो आहे. त्यानुसार अधिकाºयांनी या क्रांतिकारक योजनेत काम करताना सजग राहून कुठेही कमी पडणार नाही, याची खबरदारी घेऊन काम करावे, असा सल्ला राज्याचे मृद, जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी येथे दिला.
जलयुक्त शिवार योजनेची आढावा बैठक शनिवारी शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिर येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार उन्मेष पाटील (चाळीसगाव), आमदार डी. एस. अहिरे (साक्री), विधान परिषदेच्या स्मीता वाघ, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते (धुळे), जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील (जळगाव), मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, संचालक कैलास मोते, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे (धुळे) आदी उपस्थित होते.
धुळे तालुक्यातील कामांची पाहणी
मंत्री प्रा. शिंदे यांचे सकाळी धुळ्यात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील बोधगाव शिवारातील वाघी नाल्यातील जलसाठा, नरव्हाळ शिवार व बाबरे येथील साठवण बंधाºयांची पाहणी करून जलपूजन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
जिओ टॅगिंगमध्ये धुळे जिल्हा मागे
तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केल्यानंतर राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात नाशिक विभागायस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव येथील जिल्हाधिकाºयांनी आढावा सादर केला. यात जिओ टॅगिंगमध्ये धुळे जिल्हा सर्वात मागे असल्याचे समोर आले. ही माहिती समोर आल्यानंतर मंत्री प्रा. शिंदे यांनी प्रांताधिकारी गणेश मिसाळ व नितीन गावंडे यांची कानउघडणी करीत त्वरित हे काम मार्गी लावावे, असे आदेश दिले.
जि.प. अध्यक्ष- भाजपाच्या पदाधिका-यांमध्ये जंपुली
आढावा बैठकीत भाजपाचे तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. जितेंद्र ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्यासह पदाधिकाºयांनी मंत्री प्रा. शिंदे यांना सांगितले, की जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शिरपूर तालुक्यात जी कामे केली जाताहेत. त्याला शिरपूर पॅटर्नची नावे दिली जात आहेत. हे चूकीचे असून जलयुक्तच्या कामांना शिरपूर पॅटर्नची नावे देणे योग्य नाही, असे सांगताच जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी मंचावर उभे राहत कॉँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्त्वात ही कामे केली जात आहेत. त्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता होईल, असे अनेक कामे केली जात आहेत. परंतु, याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगताच, मंचावर उपस्थित भाजपाचे पदाधिकारी व जि.प.अध्यक्ष यांच्यात जुंपली. वाद वाढू नये, म्हणून मंचावर उपस्थित मंत्री प्रा. शिंदे यांनी मध्यस्ती करत वाद वाढू दिला नाही.