मुख्यमंत्र्यांच्या दौºयानिमित्त दोंडाईचा पोलिसांतर्फे धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 06:00 PM2018-12-26T18:00:52+5:302018-12-26T18:02:12+5:30
पोलीस स्टेशनला बसून : मंत्री आल्याशिवाय जाणार नाही, नरेंद्र पाटील यांचा निर्णय
आॅनलाईन लोकमत
दोंडाईचा (जि.धुळे) : मंत्रालयात विष प्राशन करुन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलावर दोंडाईचा पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयानिमित्त प्रतिबंधात्मक कारवाई करुन सकाळपासून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. नंतर जोपर्यंत मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही तोपर्यंत जाणार नाही, अशी भुमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौºयावर येणार असल्याने दोंडाईचा पोलिसांनी मंत्रालयात विषप्राशन करुन आत्महत्या करणाºया विखरण ता.शिंदखेडा येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई धर्मा पाटील आणि मुलगा नरेंद्र धर्मा पाटील यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी सहा वाजेपासून विखरण येथून आणून पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते.
दुपारी मुख्यमंत्री दोंडाईचा येथून गेल्यानंतरसुद्धा नरेंद्र पाटील यांनी पोलीस स्टेशनमधून परत जाण्यास इन्कार केला. त्यांनी सांगितले की, मी २४ डिेसेंबर रोजीच दोंडाईचा पोलिसांना लेखी लिहून दिले होते की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याद्वारे असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. असे लेखी लिहून दिल्यानंतरही मला आणि आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले. त्यामुळे आता स्वत: मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत आपण येथून जाणार नाही, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी जाहीर केली.
कारण आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक मंत्री याठिकाणी येतील. तेव्हा दरवेळेस मला आणि माझ्या कुटुंबियांना अशापद्धतीने त्रास दिला जाईल का, असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.