धुळ्यात हॉर्न वाजवू नका, सांगितले म्हणून महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 05:09 PM2023-05-04T17:09:22+5:302023-05-04T17:10:32+5:30
धुळे तालुक्यातील एका गावात १ मे रोजी पीडितेच्या भाचीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमानिमित्त नातेवाईक घरासमोरील रस्त्यावर जमलेले होते
राजेंद्र शर्मा
धुळे - तालुक्यातील एका गावात हळदीच्या कार्यक्रमानिमित्त घरासमोर पाहुणे जमा झालेले असताना रस्त्यावरून दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांनी हॉर्न वाजविला. त्यांना हॉर्न वाजवू नका असे समजावून सांगितले असता राग आलेल्या चौघांनी जमलेल्या पाहुण्यांना शिवीगाळ केली. तसेच बेदम मारहाण करीत महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी चार जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
धुळे तालुक्यातील एका गावात १ मे रोजी पीडितेच्या भाचीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमानिमित्त नातेवाईक घरासमोरील रस्त्यावर जमलेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच १८ एजे ९५१६) चार जण जात होते. तेव्हा अंगणातील मंडळी बाजूला होण्याकरिता दुचाकीस्वाराने जोरजोरात हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. त्यास हळदीचा कार्यक्रम सुरू असून, तू दुसऱ्या गल्लीतून तुझे वाहन ने, मोठ्याने हॉर्न वाजवू नको असे सांगितले. याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ करीत मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच समजून सांगणाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. झटापटीत तिच्या गळ्यातील सोनपोत तुटून गहाळ झाली. पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.