धुळ्यात दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:11 PM2018-06-12T23:11:51+5:302018-06-12T23:11:51+5:30
मृतांच्या रक्ताचे नमुने पाठविणार प्रयोगशाळेत : पोलिसांकडून तपासाला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपुरातील बाप-बेट्याच्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या संख्येत आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ निजामपूरला सापडलेल्या कारनंतर काही बाबी चौकशीतून समोर येत आहेत़ दरम्यान, मयत रावसाहेब आणि त्यांचा मुलगा वैभव यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते प्रयोग शाळेत पाठविले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़
देवपुरातील सरस्वती कॉलनीतील रावसाहेब पाटील (५४) आणि त्यांचा मुलगा वैभव (२१) यांच्या हत्येप्रकरणी ८ जणांविरुध्द संशयावरुन खुनाचा गुन्हा दाखल झाला आला आहे़ तपासाची चक्रे फिरवित पश्चिम देवपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन ८ संशयितांपैकी ६ जणांना अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत़ त्यांची कसून चौकशी केली जात आहे़
चौकशीतून कारचा उलगडा
आईची तब्येत बरी नाही, तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे, असे सांगत दर्शन परदेशी नामक व्यक्तीने निजामपूर येथील राणे नगरातून एमएच १५ डीजे ३७०० या क्रमांकाची कार मिलिंद भार्गव यांच्याकडून धुळ्यात आणली आणि घटनास्थळावरुन पळून जाण्यासाठी या कारचा आम्ही वापर केला असे कोठडीतील आरोपींच्या सांगण्यावरुन कारचा उलगडा झाला़
संशयित दर्शन परदेशी रडावर
आता ही कार आणणारा दर्शन परदेशी या संशयिताचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे़ त्याला शोधण्यासाठी धुळ्याचे पथक निजामपुरला गेले होते. मात्र तो न सापडल्याने, पथकाला खालीहात परतावे लागले. तो हाती लागल्यानंतर या दुहेरी खून प्रकरणात त्यालादेखील आरोपी केले जाईल, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे़ पोलीस त्याच्या शोधात आहेत़
वाहनातून घेतले रक्ताचे नमुने
मयत रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव या दोघांना घटनास्थळावरुन जखमी अवस्थेत एमएच १८ डब्ल्यू ५७७८ या क्रमांकाचे वाहनातून शहरातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल केले होते़ त्यामुळे या वाहनात दोघांचेही रक्त सांडले होते़ परिणामी हे वाहन तपासणीसह रक्ताचे नमुने घेण्यासाठी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला हे वाहन आणण्यात आले होते़
सहायक रासायनिक विश्लेषक हालोर यांनी या वाहनातून रक्ताचे नमूने घेतले़ याप्रसंगी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक आणि दोन कर्मचारी यांच्या उपस्थितीत हे नमुने संकलित करण्यात आले़ आता हे नमुने उत्तरीय तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले जाणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले़
संशयित बाजीरावांची चौकशी
दुहेरी खून प्रकरणातील संशयित माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे़ अन्य संशयित आरोपींप्रमाणे त्यांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे़ चौकशीचा एक भाग म्हणून बाजीराव पवार यांची मंगळवारी स्वतंत्र चौकशी करण्यात आली आहे़ त्यांचा या गुन्ह्यात किती सहभाग आहे, गुन्हा घडण्यामागे नेमके कोणते कारण होते, यासह अन्य मुद्यांच्या अनुषंगाने त्यांची चौकशी झाल्याचे सुत्रांनी सांगितले़