चारित्र्यावर संशय, पत्नी-मुलीने चोपले! पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून देवपूर पोलिसांत गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: November 4, 2023 05:27 PM2023-11-04T17:27:18+5:302023-11-04T17:27:27+5:30
हा प्रकार २९ ऑगस्ट २०२२ ते २६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला
देवेंद्र पाठक, धुळे : चारित्र्याचा संशय घेत जाब विचारल्याने राग आला. या रागातून वाद घालत पत्नीसह मुलीने शिवीगाळ करत मारहाण केली. वेळोवेळी छळ करण्यात येत असल्याने जाचाला कंटाळून पीडित पतीने पत्नी आणि मुलीविरोधात फिर्याद दाखल केली. हा प्रकार २९ ऑगस्ट २०२२ ते २६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल झाला.
देवपुरातील एका भागात पीडित व्यक्ती आपल्या पत्नी, मुलीसह वास्तव्यास आहे. त्यांचा संसार सुरू असतानाच पत्नीचे बाहेरील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याची बाब पतीला लक्षात आली. त्याने तिच्यावर पाळत ठेवली. त्याला पत्नीविषयी माहिती मिळाल्याने त्यांच्यात वाद सुरू झाले. चुकीच्या प्रकाराबाबत जाब विचारल्याने त्यांच्यात दररोजच वाद होणे, त्यातून मारहाण करत काठीचा वापर करणे, यात पत्नीला मुलीची साथ असल्याने दोघांकडून छळ सुरू होता.
हा सर्व विचित्र प्रकार हा प्रकार २९ ऑगस्ट २०२२ ते २६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. सतत होत असल्याच्या जाचाला कंटाळून पीडित व्यक्तीने न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली. कामकाज होऊन न्यायालयाच्या आदेशाने देवपूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजता भादंवि कलम ३०७, ४९८, ५०४, ५०६ (२), ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक राजेश इंदवे घटनेचा तपास करीत आहेत.