धुळे जिल्ह्यात सातबारा दुरुस्तीला सर्व्हरचा डाऊनचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 09:29 PM2017-12-03T21:29:24+5:302017-12-03T21:31:32+5:30
जिल्ह्यातील ६७८ पैकी ११६ गावातील सातबारे अद्ययावत : ५६२ गावातील सातबारा दुरुस्तीचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आॅनलाइन सातबाºयांमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर शासनाने सातबा-यांमधील त्रुटींची दुरुस्ती (रि एडिट मॉड्यूल) करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सातबारा दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचे सर्व्हर वारंवार डाऊन येत असल्याने गेल्या दोन महिन्यात ६७८ गावांपैकी केवळ ११६ गावांचे सातबारे अद्ययावत झाले असून ५६२ गावातील सातबारा दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वसामान्यांना प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे वारंवार झिजवावे लागू नयेत, यासाठी शासनाने आॅनलाइन सातबारा तयार करावा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून तलाठ्यांनी दिवस-रात्र एक करत आॅनलाइन सातबारे तयार केले. परंतु, गावपातळीवर झालेल्या चावडी वाचनात सातबाºयांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे शासनाने त्रुटी आढळून आलेल्या सातबाºयांची दुरुस्ती रि एडिट मॉड्यूल सॉफ्टवेअरद्वारे करावी, असे प्रशासनाला सूचित केले. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ६७८ गावांपैकी ११६ गावांतील सातबारे अद्ययावत झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
संकेतस्थळाचे सर्व्हर दिवसभर डाऊन
सातबा-यातील चुका दुरुस्तीसाठी असलेले रि एडिट मॉड्यूल संकेतस्थळावर राज्यभरात एकाचवेळी हे काम सुरू असल्यामुळे हे संकेतस्थळ अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचे सांगितले जाते. सायंकाळी सहा वाजेनंतरच हे संकेतस्थळ व्यवस्थित चालते. त्यामुळे तलाठी व कर्मचाºयांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कार्यालयात थांबून रहावे लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे जिल्ह्यातील तलाठी व मंडळाधिकारी हैराण झाले आहेत.
वेंडिंग मशीनची प्रतीक्षा कायम
आॅगस्ट महिन्यात आॅनलाइन सातबारा सॉफ्ट कॉफीचा शुभारंभ झाला. तेव्हा एटीएम मशीनमधून जसे पैसे मिळतात; त्याप्रमाणे वेंडिंग मशीनद्वारे सातबारा नागरिकांना मिळेल, असे सांगितले होते. परंतु, प्रशासकीय पातळीवर तूर्त तरी वेंडिंग मशीन आणण्याबाबत हालचाली दिसत नाहीत. सातबारा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हे मशीन येऊ शकते, असे सांगितले जात आहे.