डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिरपुर तालुक्यात ३३ पुतळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:35 PM2019-04-13T22:35:08+5:302019-04-13T22:36:02+5:30
औचित्य जयंतीचे । विविध मार्ग व कॉम्प्लेक्सलाही डॉ़ बाबासाहेबांचे नाव
सुनील साळुंखे ।
शिरपूर : शहरातील डॉ़ शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळ्यासह तालुक्यात एकूण ३३ पुतळे आहेत़
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती पारंपारीक पध्दतीने साजरी केली जात आहे़ शहरात डॉ़ शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात व मार्केट आवारात पूर्णाकृती पुतळा तर वरचे गावातील बौध्दवाड्यात डॉ़ बाबासाहेबांचा पुतळा आहे़ याशिवाय शिरपूर पोलिस ठाणे हद्दीत १७, थाळनेर पोलिस ठाणे हद्दीत ५ तर सांगवी पोलिस ठाणे हद्दीत ८ असे एकूण ३० पुतळे उभारण्यात आली आहेत़
शहरात विविध संस्था व मार्गांना डॉ.बाबासाहेबांचे नावे देण्यात आले आहेत़ त्यात बोराडीसह जातोडे येथील विद्यालयांचा समावेश आहे़ तर शिरपूर शहरातील नाट्यगृहे आणि विविध रस्ते यांना देखील डॉ़ बाबासाहेब यांचे नाव देण्यत आले आहेत़ दिलीप टी हाउस ते आंबेडकर चौक वरचे गावपर्यंतचा मार्ग तसेच इंदिरा मेमोरिअल हॉस्पिटलच्या खालच्या भागास भीमनगर, नगरपालिकेच्या शेजारील शॉपिंग कॉम्प्लेक्सला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग कॉमप्लेक्स, वरच्या गावातील बौध्द वस्तीलाही नाव दिलेले आहेत़ जनजागृती करण्यासाठी जागर मंच शहरात कार्यरत आहे़ त्यांचे विचार व कार्यावर आधारलेले प्रबोधनपर, जागृतीपर आणि क्रांतिकारी गीते एखादा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी उपस्थितांना जागेवर बसवून ठेवण्यासाठी हा मंच काम करतो. क्रांतीनगरात त्रिरत्न बुद्धविहार, खालचे गाव बौध्दवाडा येथील समाज मंदिरास समाज भवन, कोर्टासमोरील फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृह बांधून दिले आहे़
सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सी. एच. निकुंभे यांनी ग्रंथ संपदा प्रकाशित केली आहे़ त्यात डॉ. बाबासाहेबांनी बहिष्कृत समाजाला मानवी प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, यासाठी आयुष्यभर आपले लिखाण आणि भाषणातून प्रबोधन केले़ त्या प्रबोधन कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ ‘समाज प्रबोधनकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकातून प्रकाशित केला आहे़
राष्ट्रीय कार्य आणि त्यांच्या राष्ट्रावादाविषयी व्यक्ती द्वेषाने पछाडलेले तथाकथित विद्वान शंका उपस्थित करतात़ त्यासंबंधी समर्पक उत्तरादाखल वास्तव मांडणी करणारा ग्रंथ ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद आणि विपर्यास’, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहासंदर्भात ब्रिटीश सरकारच्या गोपनीय अहवालाद्वारे सरकारचा चळवळीकडे पाहण्याची भूमिका विषद करणारा ग्रंथ ‘आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटीश सरकार’, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय तत्वज्ञान, त्यांचे सक्रीय राजकारण त्यांच्यानंतर रिपब्लिकन राजकारण्याची अवस्था, शासनकर्ते होण्याचे स्वप्न यावर आधारलेला ग्रंथ ‘दलितांनी शासनकर्ते व्हावे’, अनुयायांनी शासनकर्ते व्हावे, जातीसंस्थेचे उच्चाटन करावे, भारत बौद्धमय करावा आदी अनेक प्रसंगी व्यक्त केलेल्या अपेक्षावर आधारलेला ग्रंथ ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांकडून अपेक्षा’ या पुस्तकात प्रकाशित केल्या आहेत़
दरम्यान, रविवारी शिरपूर शहरात विविध शाळा-महाविद्यालय, चौका-चौकात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याने कार्यकर्त्यांचे नियोजन सुरु होते़