धुळे शहरात विसर्जन मिरवणूक मार्गावर खड्ड्य़ांचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 11:38 AM2019-09-11T11:38:46+5:302019-09-11T11:40:19+5:30
खड्ड्यांमुळे अपघाताची भीती, महानगरपालिकेने रस्त्याची डागडुजी करण्याची आवश्यकता
आॅनलाइन लोकमत
धुळे : जल्लोषात स्वागत करण्यात आलेल्या गणरायाला आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. यानिमित्त सार्वजनिक मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मात्र ज्या मार्गावरून विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होणार आहे, त्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व्ह उघडे आहेत. इलेक्ट्रीक वायरी लोंबकळलेल्या आहेत.संबंधित विभागाने रस्ता दुरूस्तीकरून विसर्जनाचा उत्साह वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असून या मार्गाची पहाणी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केली असता, त्यात वरील समस्या आढळून आली.
महाराष्टÑाचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे गेल्या सोमवारी जल्लोषात आगमन झाले होते. या दहा दिवसाच्या कालावधीत अनेक मंडळांनी विविध उपक्रम राबवून या उत्सवात रंगत आणली होती. आता वेध लागले आहे ते बाप्पाला निरोप देण्याचे.
विसर्जनासाठी शहरातील सर्वच मंडळाच्या गणेश मूर्ती या पाच कंदील परिसरात आणल्या जातात. तेथून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. तसेच काही मंडळाच्या विसर्जन मिरवणुकांना शिवाजी पुतळ्यापासून सुरूवात होत असते.
विसर्जन मिरवणुकांना कुठलाही अडथळा येवू नये, यासाठी रस्ते चांगले असणे, लोंबकळलेल्या तारा दूर करणे, तसेच पाण्याचे उघडे व्हॉल्व्ह बंद करणे गरजेचे आहे. नेमकी याच्या उलट परिस्थिती विसर्जन मिरवणूक मार्गावर दिसून आली.
शिवाजी पुतळ्याजवळील रस्त्यावर लहान लहान खड्डे पडलेले आहेत. त्याच्या थोडे पुढे आल्यानंतर पाच कंदील भागातच जागोजागी खड्डे पडलेले दिसून आले. तेथून मात्र फुलवाला चौक पर्यंतचा रस्ता अतिशय चांगला आहे.
मात्र गांधी पुतळ्याजवळच्या रस्त्याची पार दुर्दशा झालेली आहे. याठिकाणी जागोजागी खड्डे पडलेले दिसून आले. गांधी पुतळा परिसरात शेकडो नागरिक विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी येत असतात. परंतु याच भागात पाण्याचे दोन व्हॉल्व्ह उघडे असल्याचे दिसून आले. रात्रीच्यावेळी तसेच गर्दीत या उघड्या व्हॉल्व्हकडे कोणी बघत नाही. त्यात अनावधनाने कोणाचा पाय पडल्यास, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने या व्हॉल्व्हवर तात्पुरते झाकण ठेवण्याची आवश्यकता आहे.
मुख्य विसर्जन मिरवणुक वगळता काही मंडळे आपल्या सोयीनुसार विसर्जन मिरवणुका काढतात. फाशी पुलाकडील काही गणेश मंडळे शिवतीर्थ मार्गे मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. तर काहीजण गणपती पुलामार्गे जात असतात. मात्र फाशी पुलाकडून येणाऱ्या मिरवणुकांनाही खड्डयांचा अडथळा आहे. शिवतीर्थजवळच मोठा खड्डा पडलेला आहे.
महापालिकेने डागडुजी करावी
विसर्जन मिरवणूक निघण्यास अजून एक दिवसाचा कालावधी आहे. तत्पूर्वीच महानगरपालिकेने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्याची दुरूस्ती करावी.
त्याचबरोबर वीज वितरण कंपनीने लोंबकळलेल्या तारा ओढाव्यात अशी मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.