खान्देशसाठी स्वप्नपूर्तीचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:00 PM2019-02-17T12:00:55+5:302019-02-17T12:02:00+5:30
मुख्यमंत्री : धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार
धुळे - आजचा दिवस खान्देशाच्या स्वप्नपूर्तीचा आहे. धुळे - नरडाणा रेल्वेमार्ग आणि सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेमुळे धुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. मुंबई - दिल्ली कॉरिडोर प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आघाडी सरकारने ६० वर्ष केवळ चर्चा केली. मात्र आम्ही तो प्रत्यक्षात साकार करणार आहोत. दुष्काळाची परिस्थिती असतांना पंतप्रधानांनी राज्याच्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सांगितले.
धुळेकरांचे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला धुळे महापालिकेत सत्ता मिळवून दिली. मी महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्याची पूर्ती करीत तीन महिन्यात अक्कलपाडा ते धुळे पाईप लाईन टाकण्याची योजनेचे आज भूमीपूजन केले. याशिवाय शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी आणि भुयारी गटारीची योजनाही मंजूर करुन चार महिन्यात ५०० कोटीचा निधी धुळे महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
खान्देशाचा मुकुटमणी
४गुजरात व मध्य प्रदेश राज्यांसाठी धुळे जिल्हा हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे. या जिल्ह्यातून सात राष्ट्रीय महामार्ग जातात. सात राष्ट्रीय महामार्ग जाणारा हा देशातील एकमेव जिल्हा असावा. येथे लॉजिस्टिक हब तयार होवू शकेल, प्रधानमंत्री यांनी धुळे शहराची क्षमता ओळखली. आगामी काळात मुंबई-दिल्ली कॉरिडॉर हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच रेल्वे, महामार्ग, पाण्याची उपलब्धता यामुळे या शहराचा आगामी काळात चेहरा- मोहरा बदलेला दिसेल.