पाणी, चारा टंचाईने ग्रामस्थ बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:27 PM2019-04-03T22:27:55+5:302019-04-03T22:28:41+5:30
चिमठाणे परिसर : गाव पाणीपुरवठा विहिरी आटल्या, चारा छावण्या उभारण्याची मागणी
चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात जल पातळी खालावल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात गुरांसाठी चारा व पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी व पशुपालक हवालदिल झाले आहेत. पाणीप्रश्न मार्गी लावून चारा छावण्या निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चिमठाणे हे सुमारे ८ ते १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. यंदा पुरेशा पावसाअभावी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण आहे. त्यात तीव्र उन्हामुळे दिवसेंदिवस जल पातळी अजूनच खालावत असल्याने चिंता वाढली आहे.
चिमठाणे परिसरात ८ दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी जवळपास कोरड्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चिमठाणे ग्रामपंचायतीने ७ ते ८ ठिकाणी बोअरवेल केले. परंतू ३ ते ४ ठिकाणीच पाणी लागले आहे. परंतू पाण्याची पातळी खोल गेली आहे.
यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रणरणत्या उन्हात शेतकरी गुरांना चरण्यासाठी रानावनात घेऊन जातात. परंतू रानात चाराच मिळत नसल्याने हताशपणे माघारी परतावे लागत आहे. सद्यस्थितीत चारा महाग झाला आहे. तरी सहजासहजी चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. गुरांची भूक भागविण्यासाठी पशुपालक मिळेल तेथून चारा आणताना दिसून येत आहे. गुरांसाठी पिण्याचे पाणी व चाºयाची टंचाई भासत असल्याने पशुपालक स्थलांतराच्या तयारीत दिसून येत आहेत.
बुराई बारमाही करण्यासाठी नदीवर धरणे बांधण्यात आली. परंतू पाऊसच कमी प्रमाणात झाल्याने धरण देखील कोरडे आहेत. पाणी व चाºयाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने नदी काठावरील गावकऱ्यांना आगामी काळ कसा काढावा, असा प्रश्न पडला आहे.
एकीकडे पाणी व चाराटंचाई भेडसावत आहे. दुसरीकडे युवकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना कसा करावा या विवंचनेत नागरिक दिसून येत आहे.
बुराई नदीच्या पात्रातून बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाळू चोरट्यांकडून बुराई पात्रातून राजरोसपणे अवैद्य वाळू उपसा सुरु असून प्रशासनाने त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. शासनाने पाणीप्रश्न मार्गी लावावा, चारा छावण्या उभारण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.