कालीपिवळीधारकाकडून बस चालकास मारहाण, कर्मचाऱ्यांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:29 PM2019-03-05T13:29:57+5:302019-03-05T13:33:54+5:30
दोंडाईचा : बस स्थानकासमोरील घटना, गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांचे आश्वासन
दोंडाईचा : बस स्थानकासमोर रविवारी सकाळी दोंडाईचा - पुणे बस चालकास खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कालीपिवळीधारकाने मारहाण केली. त्या घटनेचा निषेध म्हणून एस.टी.कामगार संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. शेवटी मारहाण करणाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, जखमी बस चालकावर धुळ्यात उपचार सुरु आहे.
दोंडाईचा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बस वळवितांना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दोंडाईचा - पुणे (बस क्रमांक २०७२) बस चालक आर.एम.शिरसाठ यांचे बाहेर उभ्या असलेल्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया गाडयाच्या चालकाशी वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी बस चालकाला मारहाण केली. त्यात शिरसाठ जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी आधी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याठिकाणी शिरसाठ यांच्यावर उपचार सुरु आहे.
रास्तारोको
दरम्यान, बस चालकास मारहाण झाल्याचे कळाल्यावर आगारात उपस्थितीत कर्मचाºयांनी बसेस थांबवून स्थानकाबाहेर रास्तारोको आंदोलन सुरु केले. घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा आगार प्रमुख ए.आर.चौरे या घटनास्थळी पोहचल्यात. त्यांनी कर्मचाºयांशी चर्चा केली. त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकाºयाशी चर्चा केली. आंदोलनामुळे सुमारे अर्धा वाहतूक खोळंबली होती.
बस स्थानक रस्त्यावर थेट नंदुरबार चौफुलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बस स्थानकात सुद्धा बस आहे त्याचठिकाणी उभ्या करण्यात आल्या होत्या. चर्चेअंती पोलिसांनी एस.टी. कामगार संघटनेच्या पदाधिकाºयांना बस चालक शिरसाठ यांना मारहाण करणाºयाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर एस.टी.कर्मचाºयांनी आपले रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
आंदोलन मागे घेतल्यानंतर बस वाहतूक आणि रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली होती. सुमारे अर्धा तास वाहतूक यावेळी ठप्प झाली होती.
बस चालक आर.एम.शिरसाठ यांच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांनी फिर्याद दाखल केल्यावर मारहाण करणाºया लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.