वाहन अपघात प्रकरणी चालकास सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:23 AM2019-08-27T11:23:54+5:302019-08-27T11:26:01+5:30
दोंडाईचा न्यायालयाचा निर्णय : एकाचा मृत्यू तर चौघे झाले होते जखमी
दोंडाईचा : दोंडाईचा-शहादा रस्त्यावर रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता भरधाव वेगाने वाहन चालवून एकाच्या मृत्यूस व चार जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकास सहा महिन्यांची शिक्षा व चार हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. येथील न्यायालयाने नुकताच हा निर्णय दिला.
दोंडाईचा -शहादा रस्त्यावर २८ मार्च २०१९ रोजी शहादा तालुक्यातील गणेश नगर येथील ज्ञानेश्वर रतन पाटील या संशयित आरोपीने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवले,रस्त्याचा परिस्थितिचा विचार न करता वाहन भरधाव वेगाने चालवले, त्यात ते वाहन पलटी झाले .वाहन पलटी केल्यामुळे मिनिडोअर वाहनातील प्रवाशी सुभाष राजाराम सोनार यांचा मृत्यू झाला. तर अन्य चार प्रवासीही या घटनेत गंभीर जखमी झाले होते.
संशयित आरोपी ज्ञानेश्वर रतन पाटील याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ अ-सदोष मानव वध, २७३, ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज येथील न्यायालयासमोर चालविण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता दयाराम सुरेश पाटील यांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून हा निर्णय दिला. या खटल्यात न्यायाधीश सुमित राठोड यांनी संशयित आरोपी ज्ञानेश्वर रतन पाटील यांस विविध कलमान्वये दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा व चार हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली, अशी माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता दयाराम पाटील यांनी दिली.