खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला येण्यास होतोय उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:40 PM2018-01-15T12:40:24+5:302018-01-15T12:42:56+5:30
शहीद योगेश भदाणेंवर आज सायंकाळी अंत्यसंस्कार, खलाणे गावात अनेकांची राहणार उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : शहीद जवान योगेश भदाणे यांचे पार्थिव सोमवारी जम्मू काश्मिर येथून हेलिकॉप्टरने सकाळी निघणार होते़ पण, खराब हवामानामुळे थोडा उशीर होत आहे़ अडथळे पार करीत हेलिकॉप्टर निघाले असून शिंदखेडा तालुक्यातील खलाणे या गावी दुपारपर्यंत पोहचेल़ दुपारी ४ वाजेपर्यंत अंत्यसंस्कार होतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी दिली़ दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांसाठी खलाणे ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली आहे़
जम्मू-काश्मिर येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील जवान योगेश मुरलीधर भदाणे (२८) हे शहीद झाले़ या वृत्तामुळे खलाणे गावात शोककळा पसरली़ गावात ठिकठिकाणी त्याच्या येण्याची वाट पाहणारी मंडळी सकाळपासून थांबून आहे़ चौका-चौकात देशभक्तीपर गीते वाजविली जात आहेत़ त्यांच्या अंत्यविधीची तयारी खलाणे गाव आणि प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे़ गावालगत वायपूर रस्त्यावर असलेल्या बिसा भिकन फकीर यांच्या शेतजमिनीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले़
शहीद योगेश भदाणे यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने खलाणे गावात दुपारी आल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील़ यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी डॉ़ दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन, खलाणेचे सरपंच भटू वाघ यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ सहभागी होणार आहेत़