दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:56 AM2017-07-22T00:56:27+5:302017-07-22T00:56:27+5:30

चांदसैली घाट : धुक्यामुळे घाटातील प्रवास जिकिरीचा, उपाययोजनांची गरज

Due to the collapse of the road, obstruct the traffic | दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक असणाºया चांदसैली घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यातच धुक्यांमुळे या घाटातील प्रवास सध्या अधिकच जिकरीचा झाला आहे.
चांदसैली मार्ग हा धडगावला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग आहे. त्यामुळे तळोदा, नंदुरबार, परिसरातील वाहनधारक धडगावला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्ग जाणे अधिक पसंत करतात. या मार्गाने वेळेसह पैशांचीही बचत होते. शिवाय सातपुड्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागाला जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडणारा चांदसैली घाट हा महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे दिवसभर या घाटात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.
मागील आठ ते दहा दिवसापासून सातपुड्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. दरवर्षाप्रमाणे या घाटात दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मागील दोन वर्षापेक्षा या वर्षी घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्याभरात चांदसैली घाटात पाच ते सहा ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
दरडी कोसळल्याने घाटातील रस्त्यांच्या कडेला माती व दगडांचा ढिगारा साचला असून, अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीचे ढिगारे रस्त्यांवर पसरले असून, अर्धा रस्ता साकला गेलेला आहे. आधीच घाटात रस्ता अरूंद व त्यातच रस्त्यावर साचलेल्या मातीच्या ढिगाºयांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत घाटातून वाहने चालवावी लागत आहे. अनेक ठिकाणी मातीच्या ढिगाºयांमुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडत आहेत.
या प्रकारांमुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे मागील दोन दिवसात चांदसैली घाट परिसरात पावसाने जोरदार  हजेरी लावल्याने घाटात दिवसभर दाट धुके दिसून येत आहे. या धुक्यांमुळे घाटातील रस्ता हरवल्यासारखी स्थिती निर्माण होते. अगदी पाच ते सहा फुटांवरील वाहनेदेखील नजरेस दिसून येत नाही. आधीच या घाटात ठिकठिकाणी दरडींमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याने त्यात दाट धुक्यांची भर झाल्याने घाटातून प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने घाट रस्त्यावर कोसळलेल्या मातीचे ढिगारे हटविण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घाटातून प्रवास करताना वाहनधारकांना मार्गदर्शन करणे गरजेचे झाले आहे.
घाटात सुरक्षा कठडे
चांदसैली घाटात अनेक ठिकाणी संरक्षक कठडे बसवायची गरज असून, संरक्षक कठड्यांअभावी प्रवाशांचा जीव टांगणीला असतो. या विषयी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून संरक्षक कठड्यांची मागणी लावून धरल्यामुळे चांदसैली घाटात ठिकठिकाणी नव्याने संरक्षक कठडे बसविण्यात आले आहेत.

 

Web Title: Due to the collapse of the road, obstruct the traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.