होळ (ता.शिंदखेडा) येथे दुष्काळाची दाहकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:32 AM2019-07-17T11:32:09+5:302019-07-17T11:32:55+5:30
अद्याप पाऊसच झालेला नाही : चाऱ्याअभावी पशुपालनाचा प्रश्न
भिका पाटील।
आॅनलाइन लोकमत
शिंदखेडा : तालुक्यातील होळ येथे अद्याप पाऊस पडला नसून शेतातील ढेकळेही फुटली नसल्याने पिण्याचे पाणी व गुरांसाठी चाराच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चारा नसल्याने, गुरे वाचवायची कशी अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
होळ हे टंचाईग्रस्त गाव आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून मंत्री जयकुमार रावल यांनी बुराई नदीवरून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून टंचाई दूर केली होती. मात्र बुराई नदीतून बेसुमार अवैध वाळू उपशामुळे येथील पाणीपुरवठा विहिरीनेही गेल्यावर्षीच तळ गाठला होता. या वर्षी तालुक्यात इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. मात्र चिमठाणे, खलाने, बेटावद, व नरडाणे या मंडळात पावसाने पाठ फिरवली आहे. होळ येथे टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून तोही पुरेसा नाही. पाच हजार लोकवस्तीच्या गावात सुमारे २५०० गुरे आहेत. त्यात ७०० दुभती जनावरे आहेत. आतापर्यंत लांबून पाणी आणून गुरांच्या पाण्याची व्यवस्था केली जायाची. मात्र तेथील विहिरींही आटल्याने गुरांना पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. शेतकरी सध्या गुरांसाठी बाहेर गावावारून चारा आणात आहे. येथील रामकृष्ण महारु पाटील यांनी सांगितले की माझ्याकडे १२ गुरे आहेत व १३ बिघे जमीन आहे. शेतात पेरणी केली, परंतु पाण्याअभावी काहीच उगवले नाही. गुरांना चारा नाही. हे सांगत असतांना त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या परिसरात दुष्काळाची दाहकता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.