धुळे जिल्ह्यात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:30 AM2019-07-17T11:30:09+5:302019-07-17T11:31:17+5:30
खरिप हंगाम : जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पेरण्यापूर्ण, पावसाने दडी मारल्याने पीके कोमेजू लागली
अतुल जोशी
आॅनलाइन लोकमत
धुळे : रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्रात पाऊस झाला. जिल्ह्यात धुळे तालुका वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती बऱ्यापैकी आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरूवात केली. मात्र पावसाचे आगमन अतिशय उशिराने झाल्याने, मूग, उडीद पिकांचे अपेक्षित उत्पन्न येणे कठीण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. काही ठिकाणी पिकांची थोड्याफार प्रमाणात पिकांची उगवण झालेली आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने, शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून,पाण्याअभावी पिके कोमेजू लागली आहेत. येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी स्थिती आहे. गतवर्षीच्या दुष्काळानंतर यंदा समाधानकारक पाऊस होऊन, मागील वर्षाची तूट, नुकसान भरून निघेल, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र त्यावर पाणी फिरण्याची शक्यता आहे. जून महिना त्याचबरोबर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामातील पीके हाती लागतील का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कृषी विभागाने २०१९-२० या खरीप हंगामात जवळपास ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट प्रस्तावित केले आहे. यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड प्रस्तावित असून, उर्वरित १ लाख ८३ ८०० हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, तूर, मका, नागली, भात आदी पिकांची लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते.
सुरूवात केलेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात ज्वारी ७ हजार ४३२ हेक्टर, बाजरी १६ हजार ६८९ हेक्टर, मका ४० हजार ८७३ हेक्टर, इतर तृणधान्याची ३७४ हेक्टर अशी ६५ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्याची लागवड झालेली आहे. तर तुरीची लागवड २३२० हेक्टर, मुग १० हजार ६५७, उडीद २ हजार ७९७, इतर कडधान्य १७३ हेक्टर अशी १५ हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आलेली आहे.
याशिवाय भुईमुगाची ३ हजार ८४१ हेक्टर, तीळ २६५ हेक्टर, सोयाबीन १४ हजार ३९२ हेक्टर, इतर गळीत धान्य ३१६ हेक्टर अशी १८ हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याची लागवड झालेली आहे. शेतकºयांचे पांढरे सोने समजल्या जाणाºया कपाशीची सर्वाधिक लागवड करण्यात आलेली आहे. १५ जुलैपर्यंत १ लाख ७८ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झालेली आहे. तर उसाची १२७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे. आतापर्यंत २ लाख ७९ हजार ५३३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. सर्वात कमी पेरणी साक्री तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख ४ हजार ४३ पैकी अवघ्या ४८ हजार ८६८ हेक्टर (४६.९७) क्षेत्रावर पीकाची लागवड झालेली आहे. तर सर्वात जास्त पेरणी शिरपूर तालुक्यात झालेली आहे. या तालुक्यात १ लाख २७ हजार ३९६ पैकी ८७ हजार ५६६ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. धुळे तालुक्यात ५२.९४ तर शिंदखेडा तालुक्यात ५८.०१ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. अजुनही खरिपाच्या पेरण्या सुरू आहेत.
दरम्यान काही शेतकºयांनी जून महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर पेरणी केली होती. त्या पिकांची उगवण झालेली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला होता. मात्र आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिलेली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने, काही ठिकाणी पीके कोमेजू लागली आहेत. येत्या एक-दोन आठवड्यात पाऊस झाला नाही तर ज्या पिकांची उगवण झालेली आहे, त्यांचे नुकसान होऊ शकते असा अंदाज आहे. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार का? असा प्रश्न आता शेतकºयांना सतावू लागलेला आहे. पावसासाठी आता अनेकजण देवाला साकडे घालीत आहेत.