धुळे जिल्ह्यात १८ मंडळांमध्ये अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:49 PM2019-07-21T12:49:55+5:302019-07-21T12:50:44+5:30
नदी-नाल्यांना पूर, तीन गुरे दगावली, शेतकऱ्यांना मात्र दिलासा
धुळे : जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे एकूण १८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. सुमारे २० दिवसांनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे बहुतांश नदी-नाल्यांना पूर आले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून राहिलेल्या पेरण्यांना वेग मिळणार आहे. विजा कोसळून शनिवारी दुपारी दोन बालकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. रात्री पुन्हा वीज कोसळण्याच्या घटनेत दोन गुरांचा मृत्यू झाला. नरडाणा येथे घराची भिंत कोसळली.
जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळला. यामुळे साक्री तालुक्यात रोहिणी, बुराई, शिंदखेडा तालुक्यात केसर आदी नद्यांसह नाल्यांना मोठे पूर आले आहेत. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
जिल्ह्यातील ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली त्या मंडळांची तालुकानिहाय नावे - शिंदखेडा तालुका- चिमठाणे (७५ मि.मी.), वर्शी (७२), बेटावद (९०), नरडाणा (१०२), शेवाडे (७५), धुळे तालुका - धुळे (७० मि.मी.), सोनगीर (८२), नगाव (९०), कुसुंबा (९६), नेर (११०), मुकटी (८०), बोरकुंड (१२८), पुरमेपाडा (१४६), खेडे (१५०), विंचूर (११०), नवलनगर (७४), साक्री तालुका - दुसाने (१२५ मि.मी.), दहीवेल ८५).