अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:29 AM2019-02-12T11:29:14+5:302019-02-12T11:30:26+5:30
साक्री तालुका : वसमार - दातर्ती रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : दररोज सुरु असलेली अवैध वाळू वाहतुकीमुळे वसमार ते दातर्ती रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरुन वाळूने भरलेले डंपर आणि ट्रॅक्टरच्या वर्दळीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. रस्त्याच्या डागडुजीचे काम हे केले जाते, परंतु ते इतके तकलादू स्वरुपाचे असते की, काही दिवसानंतर जैसे थे परिस्थिती निर्माण होते.
साक्री तालुक्यातील वसमार धमणार ते दातर्ती रस्त्याची अवस्था फारच बिकट आहे. अशीच परिस्थिती धमनार ते दातर्ती दरम्यानच्या रस्त्याची झाली आहे.
रस्त्यावर खूपच मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहन चालविणे म्हणजे चालकासाठी कसरतीचे काम झाले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नेहमी किरकोळ अपघात होत असतात. तर काही मोठे अपघातही झाले आहेत. त्यात काहींनी आपला जीवसुद्धा गमविला आहे.
तीन ते चार वेळेस रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आली. मात्र काही दिवसानंतर रस्त्याची परिस्थिती परत जैसे थे होते.
दुरुस्तीत पुढे खड्डे बुजले की मागे खड्डे तयार होतात. दुसरीकडे रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली निधी खर्च होतो.
रस्त्याची दुरवस्थेला वाळू वाहतूक कारणीभूत आहे. शासनाने ही अवैध वाळू वाहतूक थांबवावी तसेच रस्त्याची डागडुजी न करता पूर्ण डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.