चा-याअभावी दुग्ध व्यवसाय संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 10:18 PM2018-11-25T22:18:18+5:302018-11-25T22:19:57+5:30
मालपूर : अनेक कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न, चारा छावण्या उभारण्याची पशुपालकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील दुग्ध व्यवसाय चाºयाअभावी संकटात सापडला आहे. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असून चाºयाची उपाययोजना न झाल्यास अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रशासनाने दखल घेऊन मालपूर येथे चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी येथील पशुपालकांनी केली आहे.
धुळे जिल्ह्यात मालपूर हे दुग्ध उत्पादनात अग्रेसर गाव आहे. परिसरात दुग्ध व्यवसायावर दररोज मोठी उलाढाल होत असते. यामुळे रोजगार उपलब्ध असून अनेक कुटुंबाचा यावरच उदरनिर्वाह होत असल्याचे चित्र दिसून येते. मात्र, चाºयाअभावी हा व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे.
पाण्याअभावी संपूर्ण शिंदखेडा तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. शेतकºयांना शेती उत्पादनात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. यापुढील दिवस दुग्ध व्यवसायावर काढू, असे येथील नागरिकांचे नियोजन होते. मात्र, अचानक चाºयाच्या वाहतुकीला जिल्हा बंदी झाल्यामुळे येथे दुधाळ पशुंसाठी चाºयाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
याआधी येथे व परिसरात परराज्यातून तसेच सातपुडा पर्वत रांगाच्या पायथ्यापासून, इतर जिल्ह्यातून देखील कटर सोयाबीन कुट्टी, ज्वारी मका करबाड, उसाची बांडी आदी चारा येत होता. मात्र, जिल्हा बंदी झाल्यामुळे कमालीच्या अडचणी वाढल्या असून व तेथेही यावर्षी मुबलक चारा नसल्यामुळे सहज चारा उपलब्ध होत नाही. येथील पशुपालकांच्या कुटुंबातील एक सदस्य दिवसभर चाºयाच्या शोधासाठी रानोमाळ हिंडताना दिसून येत आहे. तरी चारा उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
चारा उपलब्ध झालाच तर त्याचे दर गगनाला भिडले असल्यामुळे तो चारा परवडेनासा झाला आहे. त्यातच अजून वाहतुकीचा खर्च आदी सर्व बाबी मिळून येणाºया दुग्ध उत्पन्नातून चाºयाचा खर्च देखील निघत नाही. यामुळे दुग्ध उत्पादकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून चारा टंचाईवर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे.
पशुपालक चिंताग्रस्त
दूध देणाºया गायी-म्हशींना कोरडा चारा व हिरवा चारा यांचे योग्य संतुलन राखावे लागते. तसेच पशुखाद्यमधील ढेप, गुलटन यांचे योग्य प्रमाण आहारात दिल्यास जनावरे चांगले दूध देतात. मात्र, कमी जास्त पशु आहार दिल्यास त्याचा दुधावर विपरित परिणाम होतो. यामुळे येथील पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत.
मालपूर व परिसरात नदी, नाले, विहीरी कोरड्या झाल्या असून हिरवा चारा कुठेही उपलब्ध होत नाही. तसेच रानावनातला व गोठ्यातील कोरडा चारा देखील संपुष्टात आल्यामुळे येथे शासन, प्रशासनाने दखल घेऊन चारा छावणी उभारावी, अन्यथा दुग्ध व्यवसाय अजूनच अडचणीत येऊन मालपूरसह सुराय, चुडाणे, अक्कलकोस, कलवाडे, कर्ले, परसोळे, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील वैंदाणे गावातील अनेक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहणार आहे.
मालपूरला दुध उत्पादक संस्थेसह ९ लहान-मोठ्या डेअरी
४मालपूर येथे श्री गोपाल दुध उत्पादक सहकारी संस्थेसह सुमारे ९ लहान मोठ्या दुध डेअरी तसेच दोंडाईचा-साक्री रस्त्यावर गोपाल मंगल कायारलयात एक दुध शीतकेंद्र आहे. मालपूर येथे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून दुध येऊन एकत्रित होत असते व वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करुन महाराष्टÑ व गुजरात राज्यात पाठविले जाते.