धुळ्य़ात मिरचीची आवक वाढल्याने दरात घसरण
By admin | Published: May 20, 2017 05:26 PM2017-05-20T17:26:19+5:302017-05-20T17:26:19+5:30
निसर्गाचीही योग्य साथ मिळाल्याने यावर्षी तब्बल 19 पट मिरचीची आवक वाढली आहे.
ऑनलाइन लोकमत
दोंडाईचा, धुळे, दि. 20 - कापसाला हमी भाव न मिळाल्याने दोंडाईचासह परिसरातील शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळला. परिणामी परिसरात मिरचीचे क्षेत्र वाढले. मिरची लागवडीनंतर निसर्गाचीही योग्य साथ मिळाल्याने यावर्षी तब्बल 19 पट मिरचीची आवक वाढली आहे. मात्र आवक वाढली असली तरी बाजारपेठेत मिरचीचे भाव गडगडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी दोंडाईचासह परिसरातील अनेक शेतक:यांनी मिरची लागवडीवर भर दिला. त्यामुळे यावर्षी मिरचीची आवक प्रचंड वाढली. मात्र, गत वर्षाच्या तुलनेत सुमारे 900 रुपये भाव कमी झाल्याने शेतक:यांचे आर्थिक गणित बिघडले असून त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
दोंडाईचा बाजार समितीत मिरचीची आवक लक्षणीय असते. येथील मिरची उद्योग खान्देशात आघाडीवर आहे. शिंदखेडा रस्त्यावर 10 ते 11 ठिकाणी मिरची वाळवण्याच्या पथारी आहेत. सुमारे 400 अकुशल कामगारांना रोजगार यामाध्यमातून मिळत आहे. सहा महिने कामगारांना हे काम करावे लागत असल्याने त्यांच्याही कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यात त्यांना अडचणी येत नाही. तसेच येथे तयार होणारी मिरची पावडर परदेशातही पाठविली जाते.
2015-16 ला 3 हजार 888 क्विंटल मिरचीची आवक झाली. त्यामुळे बाजारात 1 कोटी 15 लाख 33 हजार 940 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. त्यावेळी सरासरी प्रति क्विंटल 2 हजार 966 रुपये भाव होता. यावर्षी म्हणजे 2016-2017 या आर्थिक वर्षात 77 हजार 215 मिरचीची आवक झाली असून बाजारात 15 कोटी 86 लाख 48 हजार 492 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. मिरचीचा सरासरी प्रति क्विंटल दर 2 हजार 55 रुपये होता.
निसर्गाची कृपा, मिरची लागवडीचे वाढलेले क्षेत्र, बळीराजाने योग्य वेळी मात्रानुसार दिलेले खत, पाणी किटकनाशके, त्यामुळे मिरचीचे उत्पादन वाढले. गत वर्षापेक्षा यावर्षी मिरचीचे उत्पादन म्हणजे आवक तब्बल 19 पटीने वाढली आहे. उत्पादन वाढले असले तरी भाव गडगडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे.
दोंडाईचालगत परिसरात असलेल्या मिरचींच्या पथारीवर सुमारे 400 अकुशल कामगारांना नोव्हेंबर ते मे असे सहा महिने रोजगार मिळतो. ओली मिरची खुडण्यासाठी एका मनाला 40 रुपये तर कोरडी मिरची खुडण्यासाठी एका कामगाराला 200 रुपये मजुरी मिळते. दोंडाईचा येथील मिरची राजस्थान, गुजरातसह गुंटुरला विक्रीसाठी पाठविली जाते. यावर्षी गुटुंर येथील बाजारपेठेतही मिरचीचे भाव कमी मिळाले आहे. गेल्यावर्षी दंडी कट मिरची 150 ते 200 रुपये दराने मिळत होती. यावर्षी 900 ते 100 रुपये असा भाव मिळाला आहे.
दोंडाईचा शिवार व परिसरातील पथारीवर कामगार भर उन्हात मिरचीच्या बी जमा करण्याचे काम करत आहेत. मिरचीची बी 25 रुपये किलोने विकली जाते. तिखटामध्ये टाकण्यास व मिरचीचे रोप तयार करण्यासाठी ही बी उपयुक्त ठरते.