धुळ्यातील देवपुरात भिंत पडल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 01:13 PM2018-07-08T13:13:20+5:302018-07-08T13:14:51+5:30
ईस्लामपुरा येथील घटना : चौघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली़ त्यामुळे देवपूर परिसरातील ईस्लामपूरा भागातील इमारतीची भिंत शेजारील घरावर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले तर चार जणांना दुखापत झाल्याची घटना रविवारी सकाळी उजेडात आली़ त्यांना तातडीने रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़
पावसाचे दिवस सुरु झाले आहेत़ कुठे दमदार तर कुठे पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत़ धुळ्यात शनिवारी सायंकाळी पावसाने हजरी लावली़ क्षणार्धात पावसाने तीव्र रुप धारण केल्याने सर्वांची त्रेधातिरपीट उडाली़ त्यात देवपुर परिसरातील ईस्लामपूर भागातील गल्ली नंबर ४ येथील रहिवाशी मोहम्मद फारुख शब्बीर हसन यांच्या घराच्या बाजुला एक जुनी इमारत होती़ पावसामुळे त्या इमारतीची भिंत मोहम्मद फारुख यांच्या घरावर कोसळली़ त्यामुळे घरावर लावलेले पत्र दगडामुळे वाकून गेले़ संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले़ परिणामी या दुर्घटनेत चौघांना दुखापत झाली आहे़ त्यात मोहम्मद फारुख, बिलकिसबानो, हुमैराबानो, मुर्तुजा मोहम्मद हे जखमी झाले आहेत़ घटना घडताच लागलीच परिसरातील नागरीकांनी मदतकार्य सुरु केले होते़ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही़