बससेवा सुरू करावी यासाठी धुळ्यात ‘डफली बजाव’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 12:08 PM2020-08-13T12:08:17+5:302020-08-13T12:08:46+5:30
वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात यावी, तसेच इतर व्यवहारही सुरू करण्यात यावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे आज सकाळी धुळे बसस्थानकाच्या आवारात डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रकासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन पाठविण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, गेल्या २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनमुळे इतर व्यवहारासह एस.टी.बससेवाही ठप्प झालेली आहे. बससेवा बंद असल्याने, त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यावसायिकांवरही त्याचा परिणाम झालेला आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सर्व पदाधिकारी धुळे बसस्थानकात आले. त्याठिकाणी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘डफली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना सकाळी ८ वाजेपासून रात्री १० पर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी राज्यातील एस.टी.सेवा सुरू करावी, रिक्षाचालकांना परवानगी देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. तर एस.टी. संदर्भात विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, राज चव्हाण, शंकर खरात, योगेश जगताप, अॅड.चक्षुपाल बोरसे, नामदेव येळवे, विजय पाटील, राजदीप आगळे, सागर मोहिते, रत्नमाला सोनवणे, कल्पना सामुद्रे, नवीन देवरे,भारत देवरे, नितीन वाघ, भाऊसाहेब शिरसाठ, विजय भामरे, जितेंद्र साळवे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.